नव्या पोलिस ‘प्रभारीं’च्या नेमणुकीकडे लक्ष

Police

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहर पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या परजिल्ह्यात झाल्या असून, परजिल्ह्यातील निरीक्षकांची शहरात नेमणूक झाली आहे. शहरातील अधिकारी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले असून, नव्याने येणाऱ्या निरीक्षकांनी पदभार स्वीकारलेला नाही. शहरातील पोलिस ठाण्यांचा पदभार नुकताच इतर निरीक्षकांना दिल्याने हजर होणाऱ्या नव्या निरीक्षकांना अकार्यकारी पदावर रुजू व्हावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश होते. त्यानुसार शहरातील १० निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक, २९ उपनिरीक्षकांचीही परजिल्ह्यात नेमणूक झाली. तर त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती नाशिकला झाली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलिस निरीक्षक संजय तुंगार यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी, बडेसाब नाईकवाडे, पुणे येथून जयराम पायगुंडे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, ठाणे येथील समाधान चव्हाण, श्रीनिवास देशमुख, छत्रपती संभाजीनगरमधील आम्रपाली तायडे, गणेश ताठे, अशोक गिरी, सुशील जुमडे या सर्वांची नाशिक पोलिस आयुक्तालयात बदली झाली आहे. हे अधिकारी येत्या काही दिवसांत हजर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयुक्तालयातील १४ पोलिस ठाण्यांची सूत्रे अधिकाऱ्यांकडे असल्याने शहरातील गुन्हे शाखा, विशेष पथके, विशेष शाखा, अभियोग कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे नव्याने हजर होणाऱ्या व जुन्या निरीक्षकांची सांगड घालून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते याकडे पोलिस दलाचे लक्ष लागून आहे.

ठाण्यात अधिकारी रुजू

नाशिक पोलिस आयुक्तालयातील बहुतांश अधिकाऱ्यांची ठाणे पोलिस दलात बदली झाली. त्यामुळे पोलिस निरीक्षकांची ठाण्याला पसंती असल्याचे बोलले गेले. ठाणे शहरात बदली झालेल्या नाशिकचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर व नितीन पगार यांना मुंब्रा, अनिल शिंदे आर्थिक गुन्हे शाखा, गणेश न्यायदे कोळशेवाडी, पंकज भालेराव यांना डोंबिवली, विजय पगारे यांना कळवा, बाबासाहेब दुकले यांना बाजारपेठ या पोलिस ठाण्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नव्या पोलिस 'प्रभारीं'च्या नेमणुकीकडे लक्ष appeared first on पुढारी.