नाशिककरांची धुळीपासून होणार सुटका

नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्ते सफाईसाठी अखेर महापालिका प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे. रविवारी (दि. १८) सुट्टीच्या दिवशी शहर-परिसरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे नाशिककरांची धुळीतून मुक्तता होणार आहे.

गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे चार दिवसांपासून नाशिकमध्ये वेगाने वारे वाहत आहेत. प्रतिकिलोमीटर १५ ते २५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांमुळे शहरातील रस्त्यांसह परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नाशिककरांना सहन करावा लागतो आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने रविवारी (दि.१८) ‘शहरात उडणाऱ्या धुळीने नाशिककर त्रस्त’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सुट्टीच्या दिवशी रस्ते सफाईचे काम हाती घेतले. टिळकवाडीसह शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवित प्रशासनाने रस्ते चकाचक केले.

स्मार्टसिटी व महानगर गॅस पाइपलाइनच्या कामांसाठी शहरभरात रस्ते खोदून ठेवले आहेत. या दोन्ही एजन्सीने काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांवर मातीचा भराव टाकून काढता पाय घेतला होता. त्यानंतर महापालिकने रस्त्याच्या मधोमध डांबर ओतून या प्रकरणातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याच्या बाजूला मातीचे थर कायम आहेत. शहरात वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत ही माती उडत असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, शहरवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. दरम्यान, महापालिकेने उशिराने का होईना रस्ते सफाईचे काम हाती घेतले आहे. शहरात सलग आठवडाभर स्वच्छता मोहीम अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिककरांची धुळीपासून होणार सुटका appeared first on पुढारी.