नाशिककरांनो काळजी घ्या! शहराभोवती वाढतोय डेंग्यूचा विळखा

डेंग्यू

नाशिक : शहराभोवती डेंग्यूच्या आजाराचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन आठवड्यांत शहरात डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा हा ७०३ वर पोहोचला असून, त्यात ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पावसाचे प्रमाण कमी असतानाही यंदाच्या वर्षात डेंग्यू रुग्णसंख्येचा एकूण आकडा २३४ वर पोहोचल्याने धूरफवारणी कागदावरच होत असल्याचे चित्र आहे. दरशहरात डेंग्यू चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णसंख्या वाढलेली दिसत असल्याचा अजब दावा मलेरिया विभागाकडून करण्यात आला आहे.

शहरात पावसाळा सुरू होताच, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. यंदाही पावसाळा सुरू होताच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत गेली. जूनपर्यंत शहरात डेंग्यूचे ११६ रुग्ण होते. त्यात जुलै महिन्यात २८ रुग्णांची भर पडली. ऑगस्टमध्ये पावसाने दांडी मारल्यामुळे या महिन्यात या आजाराचा प्रादुर्भाव कमी होणे अपेक्षित असताना त्यात अधिकच वाढ होत असल्याचे रुग्णसंख्येच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल २५ रुग्णांचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आले होते. पाठोपाठ दुसऱ्या आठवड्यातही २२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तिसऱ्या आठवड्यात तब्बल ४३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यूग्रस्तांचा आकडा २३४ वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ९९ रुग्णांची नोंद झाली होती. तर जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत १७२ रुग्णांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिना पूर्ण व्हायला अजून एक आठवडा शिल्लक असल्याने या महिन्यात डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा शंभरी पार करण्याची शक्यता आहे.

डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी ६२ पथके

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून नष्ट करण्यासाठी शहरात ६२ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत शहरात तपासणी सुरू असल्याचा दावाही महापालिकेकडून केला जात आहे. तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने धूरफवारणीचे काम कागदावरच होत असल्याचे चित्र आहे.

अशी होतेय वाढ…

जानेवारी- १७, फेब्रुवारी- २८, मार्च- २८, एप्रिल- ८, मे- ९, जून- २६, जुलै – २८, ऑगस्ट – ९०, एकूण – २३४

ऑगस्ट महिन्यात संशयित रुग्णांच्या तपासणीची संख्या वाढवण्यात आली असून, तीन आठवड्यात ७०३ सॅम्पल घेतले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसत आहे. तपासणी आणि नियंत्रणासाठी ६२ पथके तैनात केली आहेत.

– डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जीवशास्त्रज्ञ, नाशिक

———-

धूरफवारणी बंद?

एकीकडे डासांचा उपद्रव वाढत असताना लोकप्रतिनिधी असताना शहरात फिरणाऱ्या धूरफवारणीच्या गाड्या आता दिसत नसल्यामुळे हा प्रकार बंद झाला की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. इंदिरानगर तसेच विनयनगर, जुने नाशिक, पेठरोड यासारख्या भागांत डासांचे प्रमाण वाढल्याने येथे धूरफवारणी करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिककरांनो काळजी घ्या! शहराभोवती वाढतोय डेंग्यूचा विळखा appeared first on पुढारी.