नाशिककरांनो, कुत्रापालनाचा परवाना नसेल तर भरावा लागेल दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अनेकांकडे पाळीव कुत्रे असले तरी, त्याबाबतचा परवाना किती लोकांनी घेतला, याबाबत शंका आहे. घरात कुत्रे पाळण्यासाठी पालिकेचा अधिकृत परवाना घेणे बंधनकारक असून, ज्यांच्याकडे परवाना नाही, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तयारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून केली जात आहे. सद्यस्थितीत शहरात अडीच हजार नागरिकांनी कुत्रे पाळण्याबाबतचे परवाने घेतलेले असले तरी, प्रत्यक्षात हजारो नागरिक विनापरवाना कुत्रे पाळत आहेत. अशात या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

घरात कुत्रा पाळण्यासाठी परवान्याचे बंधन असून, हा परवाना घेताना काही अटी-शर्तींची पूर्तता करावी लागते. यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करतात. परंतु विनापरवाना कुत्रापालन करणे कायद्याचे उल्लंघन करणारे असून, संबंधित व्यक्ती दंडास पात्र असल्याने मनपाकडून संबंधितांचा शोध घेतला जाणार आहे. दरम्यान, विनापरवाना कुत्रापालन करणाऱ्या बहुतांश नागरिकांकडील कुत्र्यांचा शेजाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना उपद्रव होत असल्याने त्याबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. परिणामी, मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाने संबंधितांना दंड ठोठावण्याची तयारी सुरू केली असून, विनापरवाना कुत्रापालन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये हजारो नागरिक विनापरवाना कुत्रापालन करीत असून, दररोज या कुत्र्याला घेऊन बाहेर फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

असा काढता येतो परवाना

कुत्रापालन परवान्यासाठी अर्ज करताना पत्त्याचा पुरावा, कुत्र्याला ॲण्टिरेबिज लस दिल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र, कुत्र्याचा फोटो आणि आपल्या कुत्र्यामुळे परिसर घाण होणार नाही याचे हमीपत्र दिल्यानंतर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून परवाना दिला जातो. याकरिता साधारणत: पाचशे रुपयांपर्यंत शुल्क असून, आतापर्यंत अडीच हजार नागरिकांनी परवाना घेतला आहे. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.

कायद्यानुसार कुत्रापालन करताना त्याबाबतचा परवाना काढणे बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी विनापरवाना कुत्रापालन करू नये. असे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती दंडात्मक कारवाईस पात्र ठरणार आहे. ज्यांनी अद्याप परवाना काढलेला नाही, त्यांनी तत्काळ याबाबतचा परवाना काढावा.

– डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा

हेही वाचा : 

The post नाशिककरांनो, कुत्रापालनाचा परवाना नसेल तर भरावा लागेल दंड appeared first on पुढारी.