नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हॉटेलमध्ये बालकामगार नसल्याचा अहवाल देत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात हॉटेल चालकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना कामगार उपआयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षकास ताब्यात घेतले आहे. निशा बाळासाहेब आढाव (५३, रा. गंगापूर रोड) असे पकडलेल्या संशयित लाचखोराचे नाव आहे.

कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत शहरातील आस्थापनांमध्ये शोध मोहीम राबवून बालकामगारांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी दोन दिवसांत भद्रकाली व इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये हॉटेल व गॅरेज चालकांविरोधात बालकामगार ठेवल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. निशा आढाव यांनी बुधवारी (दि. १४) बालकामगार कायद्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोन गॅरेज चालकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, ४० वर्षीय हॉटेल चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून आढाव यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, आढाव यांनी मंगळवारी (दि. १३) तक्रारदाराच्या हॉटेलमध्ये पाहणी करीत बालकामगार आहे की नाही याची खात्री केली. तसेच हॉटेलमध्ये बालकामगार असल्याची बतावणी करून तपासणी अहवालात बालकामगार नसल्याचा अहवाल पाठवण्यासोबतच गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात आढाव यांनी हॉटेल चालकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आढाव यांना गुरुवारी (दि. १५) कामगार उपआयुक्त कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पथकाने आढाव यांच्या घराचीही झडती घेतली.

हेही वाचा : 

The post नाशिक : हॉटेल चालकाकडून लाच घेणारी दुकान निरीक्षक गजाआड appeared first on पुढारी.