नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

गंगापूर धरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. जून महिना जवळपास कोरडा गेल्याने, हे संकट अधिकच गडद झाले होते. मात्र, जूनच्या शेवटी-शेवटी व जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाने धरण परिसरात दमदार हजेरी लावल्याने पाणीकपातीचे संकट यंदा टळले आहे. गेल्या काही दिवसांत धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात शंभर दलघफू वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेने यंदाच्या पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला आहे.

गंगापूर धरणातून नाशिककरांची तहान भागविली जाते. गंगापूरसह दारणा व मुकणे धरण मिळून वर्षभरासाठी नाशिककरांसाठी पाच हजार ८०० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित असून, दि. ३१ जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवली जाते. पण यंदा ‘अल निनो’च्या संकटामुळे मान्सूनच्या आगमनास नेहमीपेक्षा उशीर होण्याची चिन्हे वर्तविण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी उपलब्ध जलसाठा ३१ जुलैऐवजी ऑगस्ट अखेरपर्यंत पुरवण्याची कसरत मनपाला करावी लागणार होती. मात्र गंगापूर धरणातून अतिरिक्त दोनशे व दारणातून शंभर असे वाढीव तीनशे दलघफू पाणी मनपाला मिळाले. य‍ा उपलब्ध पाण्यातून येत्या 20 ऑगस्टपर्यंत नाशिककरांना पाणी पुरवणे शक्य आहे. पण वरील पाच ते सहा दिवसांसाठी पाणी तुटवडा निर्माण झाला असता. ते पाहता जूनमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यास जुलैपासून आठवड्यातून एकदा पाणीकपात तयारीचे नियोजन मनपाने केले होते. पण जूनअखेर पावसाने हजेरी लावल्याने गंगापूर धरणात शंभर दलघफू जलसाठा वाढला आहे. हे पाणी पाच दिवस नाशिककरांना पुरेल. ऑगस्ट अखेरपर्यंतचा तुटवडा पावसाने भरून काढल्याने पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे.

नाशिककरांनो पाणी जपून वापरा

पाणीकपातीचे संकट टळले असले, तरी नाशिककरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. यंदाच्या मान्सूनबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविली जात आहेत. अशात प्रत्येक नाशिककराने पाण्याचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे वापर करायला हवे. पाण्याची उधळपट्टी टाळावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे appeared first on पुढारी.