नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले…
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले…
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतील या ओळींची आठवण त्यांच्याच नावाने पंचवटीत उभारलेल्या काव्य उद्यानाची सद्यस्थिती पाहिल्यावर आल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या काव्यशिलांमध्ये ‘कणा’ या कवितेचीही काव्यशिला असून, ती गाजरगवतात हरवली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हे उद्यान स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजघडीला अखेरच्या घटका मोजत आहे.

शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेच्या समृद्धीत अमूल्य भर घालणार्‍या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावे दोन दशकांपूर्वी पंचवटीतील हनुमानवाडी शिवारात अद्ययावत उद्यान उभारण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणे लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे सद्यस्थितीत उद्यान भकास झाले असून, तेथे शब्दप्रेमींऐवजी गर्दुल्ले व मद्यपींचा वावर वाढल्याचे दिसत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही उद्यानाचे सौंदर्य, महत्त्व जपले जात नसल्याने नाशिककरांकडून खंत व्यक्त केली जात आहे. पंचवटीतील हनुमानवाडी शिवारात मात्र शहरापासून काहीशा निर्जनस्थळी कवी कुसुमाग्रजांचे उद्यान सुमारे 20 वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. या उद्यानात कालानुरूप अनेक बदल झाले. मात्र, उद्यानाकडे झालेले दुर्लक्ष कायम आहे. या उद्यानाची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीसह त्याचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी मराठी भाषाप्रेमींकडून अनेकदा प्रशासनाकडे विनंती केली आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उद्यानासाठी देण्यात आला. मात्र, कालांतराने होणार्‍या दुर्लक्षामुळे उद्यानात पाचोळा होत असून, देखभालीअभावी उद्यानाचे सौंदर्य लोप पावत आहे.

कसुमाग्रज उद्यान www.pudhari.news
कसुमाग्रज उद्यानाची झालेली दुरवस्था
कसुमाग्रज उद्यान www.pudhari.news
देखभालीअभावी कसुमाग्रज उद्यानाचे सौंदर्य लोप पावत आहे.

उद्यानाचे वेगळेपण जपण्यासाठी उद्यानातील झाडांना कुसुमाग्रजांच्या कवितांच्या नावांनी अलंकारित करण्यात आले. उद्यानातील विविध भागांना कुसुमाग्रजांची पुस्तके आणि कवितांची नावे दिली गेली. उद्यानातील शिळांवर कुसुमाग्रजांच्या कविता तसेच नाटकांमधील संवाद लिहिले आहेत. त्यामुळे उद्यानात आल्यानंतर साहित्याच्या विश्वात शिरल्यासारखा अनुभव मिळत असतो. मात्र, देखभालीअभावी आता उद्यानाची दुर्दशा होत आहे. कविता लिहिलेल्या शिळा तुटल्या असून, काही शिळा दुरुस्त केल्या; मात्र त्यांचे सौंदर्य नाहीसे झाले आहे. उद्यानातील पेव्हरब्लॉक, फरशा तुटल्या आहेत. नाटकांचे संवाद लिहिलेले स्टॅण्ड व त्यावरील शिळा नादुरुस्त आहेत किंवा काढलेल्या आहेत. उद्यानाच्या संरक्षक जाळ्याही तोडून नेल्याचे चित्र असून, त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानाच्या एका कोपर्‍यात चूल मांडल्याचे दिसत असून, तेथे गर्दुल्ले, मद्यपींचा वावर असल्याच्या खाणाखुणाही आढळत आहेत. उद्यानातील स्वच्छतागृहाची बिकट अवस्था झाली असून, स्वच्छतेअभावी तेथे दुर्गंधी तसेच भिंतींवर जाळे लटकलेले आहे. त्यामुळे उद्यानाकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्याचे पुनर्वैभव आणून नाशिककरांच्या साहित्यप्रेमास बळ द्यावे, अशी मागणी होत आहे.

कसुमाग्रज उद्यान www.pudhari.news
कसुमाग्रज उद्यानाची झालेली दुर्दशा

कुसुमाग्रज हे नाशिकचे भूषण आहे. त्यांच्या नावे असलेले उद्यान दुर्लक्षित झाले असून, त्याकडे लक्ष देणे मनपाचे कर्तव्य आहे. उद्यानातील अनेक साहित्यांची तोडफोड, नुकसान झाले आहे. – गुरुमित बग्गा, माजी नगरसेवक.

जीर्ण पाचोळा पडे तो उदास…
‘आडवाटेला दूर एक माळ, तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगुनिया पदास, जीर्ण पाचोळा पडे तो उदास’ या कवी कुसुमाग्रजांच्या भावगर्भ कवितेत वृद्धांची व्यथा व त्यांच्याकडे समाजाची पाहण्याची दृष्टी याचे वर्णन आहे. मात्र, वृद्धांनी उदास जीवन व्यतित करण्यापेक्षा आपल्यातील नवनिर्मितीच्या बीजांची जपणूक करून आणि अनुभवाची जोड दिली तर उर्वरित जीवनात नवसंजीवनी आल्याचा त्यांना प्रत्यय येईल, असा संदेश दिला आहे. या कवितेतील संदेशाप्रमाणेच लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने मरगळ झटकून उद्यानाची देखभाल केल्यास उद्यानास पुनर्वैभव मिळेल, यात शंका नाही.

कुसुमाग्रज उद्यान नदीकिनारी असल्याने पुराचे पाणी येत असते. त्यामुळे तेथे बांधकाम करणे शक्य नाही. उद्यानाच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करू. संरक्षक जाळीला पर्याय शोधण्यात येईल. मासेमारी करणारे लोक उद्यानात येऊन मासे भाजतात. संरक्षक जाळ्यांजवळ काटेरी झाडे लावण्याचा विचार करू. – विजयकुमार मुंडे, उपआयुक्त, उद्यान विभाग, मनपा.

कसुमाग्रज उद्यान www.pudhari.news
कसुमाग्रज उद्यानातील शिळांवरील कुसुमाग्रजांच्या कविता आजही मनाला उभारी देत आहेत. (सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

हेही वाचा:

The post नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका appeared first on पुढारी.