जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

जळगाव,www.pudhari.news

जळगाव : आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज (दि.२३) पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर-धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी (एमएच १९ डीव्ही ४१९९) क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील भोणे फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून धडक दिली. यात ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले असलेले एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाले.

घटनास्थळी ग्रामस्थांनी केले मदतकार्य

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, गटविकास अधिकार्‍याचा मृत्यू झाल्याने प्रशासनातील कर्मचार्‍यांनी देखील अपघातस्थळ गाठले. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या घटनेची पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या अमळनेर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्याकडे यावल येथील गटविकास अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील होता. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हा अपघात धरणगाव तालुक्यात झाला असून एकनाथ चौधरी यांचा मृतदेह येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे.

The post जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार appeared first on पुढारी.