नाशिक : पत्र्याच्या पडवीत भरते अंगणवाडी ; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष

पत्र्याच्या पडवीत भरते अंगणवाडी,www.pudhari.news

पुढारी वृत्तसेवा : अनिल गांगुर्डे, वणी

अहिवंतवाडी ग्रामपंचायत मधिल खिल्लारी वस्तीतील आंगणवाडीची इमारत पडल्याने वर्षभरापासून एका मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या पडवीत मुले बसत आहेत. या आंगणवाडीत २० ते २५ मुले आहेत. एकीकडे शासन यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असले तरी येथील अंगणवाडीकडे मात्र यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

या ठिकाणी एक वर्षापूर्वी सुस्थितीत आंगणवाडी होती. त्यात कामकाज सुरू होते. आंगणवाडीच्या बाजुला नविन आंगणवाडी बांधण्यात येत होती. मात्र बांधकाम अतिशय निकृष्ट असल्याने अर्धे बांधकाम सुरू असतानाच त्याच्या भिंती पडल्या. एक भिंत तर सुस्थितीत असलेल्या अंगणवाडीच्या इमारतीवरच पडल्याने ती मोडकळीस आली. ऐन पावसाळ्याच्या आगोदर हा प्रकार घडला होता. यामुळे बाजुलाच प्रकाश गायकवाड यांच्या पत्र्याच्या पडवीत आंगणवाडी भरवली जात आहे.

दिंडोरी पंचायत समिती बांधकाम विभागाची ही जबाबदारी असून मागील वर्षभरात त्यांचे दुर्लक्ष झाल्याची ओरड येथील ग्रामस्थ करीत आहेत. नविन आंगणवाडीचे बांधकाम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याने काम अर्धवट सोडले आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे सुस्थितीत असलेली अंगणवाडीही मोडकळीस आल्याने त्याच्यावर कारवाई होणे आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम विभाग पं.स दिंडोरी यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. उलट मागील एक वर्ष याकडे केले दुर्लक्ष आहे.

आदिवासी भागातील मुलांना उघड्यावर पत्र्याचा पडवीत बसावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असून पत्रे मोठ्या प्रमाणात तापतात. तरीही मुले तेथेच बसत आहेत. शुक्रवारी (दि.३१) या भागातील ग्रामस्थांनी एकत्र पाहणी केली. येथील लोकांनी केलेल्या तक्रारीनुसार पाहणी करताना अत्यंत वाईट परिस्थिती समोर आली आहे. तरी संबंधित विभागाने या अंगणवाडीचे काम त्वरित चालू करावे, अशा प्रकारचे काम होत असतील तर प्रशासन झोपा काढत आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. अंगणवाडी सेविका मीना भुसार ह्या अशा परिस्थितीत मुलांना सांभाळत आहेत. सामाजिक कार्यकर्ते संतोष रेहरे, ग्रा.पं सदस्य अंकुश शार्दुल, शिवाजी गांगोडे, प्रकाश गायकवाड, दीपक गायकवाड, गिताबाई बहिरम यांनी आंगणवाडीला भेट दिली. प्रशासकीय यंत्रणेकडुन त्वरीत दखल घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

हेही वाचा :

The post नाशिक : पत्र्याच्या पडवीत भरते अंगणवाडी ; प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.