नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र

गिधाड संवर्धन केंद्र,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निसर्गाचा स्वच्छतादूत असलेल्या गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे राज्यातील पहिले केंद्र उभारण्यात येणार आहे. वन मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली असून, आठ कोटींचा निधीदेखील मंजूर केला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग सुकर बनला आहे.

अंजनेरी येथील डोंगर भागात मोठ्या प्रमाणावर गिधाडांचे वास्तव्य आहे. तेथे विविध प्रकारची दुर्मीळ गिधाडांच्या जाती आढळून येत असल्याने हा भाग संरक्षित करण्यात आला आहे. तसेच येथील गिधाडांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याची जुनी मागणी वन्यप्रेमी तसेच पक्षिप्रेमींची होती. त्यानुसार केंद्रीय वन मंत्रालयाने सन २०२१ च्या पंचवार्षिक धोरणात्मक कृती आराखड्यात देशात गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्रासाठी ठराविक ठिकाणे निश्चित केली. त्यामध्ये अंजेनरी येथील गिधाड प्रजनन केंद्रासह उत्तर प्रदेशामधील गोरखपूर, तामिळनाडूच्या कोईम्बतूर, कर्नाटकातील रामनगर आणि त्रिपुरा या ठिकाणीदेखील उभारले जाणारे याच पद्धतीचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक कार्यालयाकडून अंजनेरी गिधाड प्रजनन केंद्राचा आराखडा केंद्रीय वनविभागाकडे सादर केला आहे. आराखड्यातील विविध उपाययोजनांसाठी आठ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास वन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. पुढील टप्प्यात वनविभागाकडून अंजनेरी भागात आवश्यक जागा निश्चितीसह तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रकल्प उभा करण्यात येईल.

गिधाडांना हक्काचा निवारा

अंजनेरी परिसरात गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र विकसित केले जाणार आहे. नाशिक मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक कार्यालयाकडून या केंद्राच्या कार्यावाहीला प्रारंभ झाला आहे. भविष्यात अंजनेरी भागामध्ये गिधाडांसाठी हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे.

The post नाशिकच्या अंजनेरी येथे उभारणार पहिलं गिधाड संवर्धन केंद्र appeared first on पुढारी.