नाशिकच्या कॅलिफोर्निया’चा पारा पुन्हा घसरला

थंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

हिमालयातील बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे निफाडचा पाऱ्यात रविवारी (दि. १२) ५.५ अंशांपर्यंत घसरण झाल्याने अवघा तालुका गारठला आहे. नाशिक शहराच्या तापमानातही घसरण झाली आहे.

उत्तर भारतामधील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील तापमानातही घसरण झाली आहे. नाशिकचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाडमध्ये पारा ६ अंशांखाली आला आहे. त्यामुळे तालुक्यात गारठा वाढला असून, बदललेल्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. गहू व हरभरा वगळता अन्य पिकांसाठी हे हवामान नुकसानकारक असल्याने बळीराजासमोर संकट उभे ठाकले आहे.

नाशिक शहरातील किमान तापमानाचा पारा १०.२ अंशांवर स्थिरावला आहे. हवामानातील या बदलामुळे थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. विशेषत: पहाटे व रात्रीच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने नागरिक उबदार कपड्यांची मदत घेत आहे. सोमवार (दि. १३)पासून बहुतांश जिल्ह्यात ढगाळ हवामान निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या कॅलिफोर्निया'चा पारा पुन्हा घसरला appeared first on पुढारी.