नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जलज शर्मा, गंगाथरन डी. यांची बदली

नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दोन महिन्यांपासून बदलीच्या प्रयत्नात असलेले जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची अखेर बृहृन्मुंबई महापालिकेत सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर शासनाने धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती केली आहे. गंगाथरन डी. यांच्या नेतृत्वात गेल्या शनिवारी (दि.१५) नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला हाेता. शासनाने गंगाथरन डी. यांची मुंबई महापालिकेत बदली करत कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल एक प्रकारे कौतुकाची थाप दिली आहे.

शासनाने शुक्रवारी (दि.२१) राज्यभरातील आयएएस दर्जाच्या तब्बल ४१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या बदल्यांमध्ये नाशिकचे गंगाथरन डी. यांचा समावेश आहे. शासनाने त्यांची मुंबई महापालिकेत बदली केली आहे. त्यांनी १० मार्च २०२२ रोजी नाशिक जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. गेल्या सव्वा वर्षाच्या कालावधीत प्रशासनाने सर्वच विभागात चांगले काम केले. त्यांच्या मार्गदर्शनात गेल्या आर्थिक वर्षात १०० टक्के महसूल उद्दिष्टपूर्ती गाठली.

गंगाथरन डी. यांनी त्यांच्या कार्यकाळात बहुप्रतीक्षित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा साठी सिन्नर व नाशिक तालुक्यातील २१ गावांमधील जमिनीचे दर अंतिम करण्याचे काम केले. या शिवाय जिल्ह्यात अतिवृष्टी बाधितांना मदतीचे वाटप, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत जमिनीची संयुक्त मोजणी करणे आदी कामांना त्यांनी गती दिली. पंढरपूर निर्मलवारीतील वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. चालूवर्षाच्या प्रारंभीच इगतपुरीतील जिंदाल कंपनी आगीच्या घटनेत त्यांनी उत्कृष्ट नेतृत्वाची चुणूक दाखवित सर्व विभागांच्या मदतीने आपत्तीवर नियंत्रण मिळविले.

गेल्या वर्षी नाशिक तालुक्यातील सारूळ व त्र्यंबकेश्वरमधील अनधिकृत डोंगर पोखरण्याचे प्रकरण मंत्रालयस्तरावर पोहोचले होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी थेट जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याने गंगाथरन डी. काहीसे चर्चेत आले होते. दरम्यान, एप्रिल महिन्यापासून गंगाथरन देवराजन हे बदलीसाठी प्रयत्नशील होते. पण, अवकाळी, राज्यातील सत्ता संघर्ष व अन्य कारणांमुळे त्यांची बदली होऊ शकली नव्हती. अखेर गंगाथरन डी. यांच्या बदलीचे आदेश शासनाने काढले असून, त्यांची बदली मुंबई महापालिकेत करण्यात आली आहे.

जलज शर्मा यांचा परिचय

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी जलज शर्मा हे चंदिगड येथील असून, त्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१४ च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी जळगाव येथे उपविभागीय अधिकारी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नागपूर महागरपालिका अतिरिक्त आयुक्तपदांवर काम केले आहे. सध्या ते धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जलज शर्मा, गंगाथरन डी. यांची बदली appeared first on पुढारी.