नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयासह 430 खाटांच्या रुग्णालय बांधकामास मान्यता

आरोग्य विज्ञान विद्यापीठ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारतीच्या बांधकामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

आ. भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे यासाठी मागणी करत सतत पाठपुरावा केला होता. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संस्थेचे 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. इमारत बांधकामासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने 348 कोटी 41 लाख इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेने वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याकरिता शासनाने 10 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आणि 5 एप्रिल 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 627.62 कोटींचा प्रस्ताव कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांनी 29 मार्च 2022 रोजी त्रुटींची पूर्तता करून शासनाला सादर केलेला होता. 5 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य सचिवांच्या उच्चस्तर समिती बैठकीमध्ये या विषयाला मंजुरी मिळालेली होती.शैक्षणिक वर्ष 2022- 23 पासून नाशिक येथील विविध सात विषयांमध्ये महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यक परिषदेने मान्यता दिलेली असून, जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे 9 एप्रिल 2022 रोजी पदव्युत्तर वैद्यकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे. या पदव्युत्तर संस्थेसाठी अधिष्ठाता यांची 21 फेब्रुवारी 2022 रोजी नेमणूक करण्यात आली असून, इतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक यांच्या सुद्धा माहे. फेब्रुवारी 2022 मध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जवळपास 15 विषयांमध्ये वर्षनिहाय 64 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा मिळणार आहे. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय हे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या इमारतीमध्ये सद्यस्थितीत सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

कॅम्पससाठी विद्यापीठालगतची जागा…
या मेडिकल कॅम्पससाठी अधिकच्या जागेची आवश्यकता असल्यामुळे विद्यापीठाला लागून असलेली म्हसरूळ येथील गट नं. 257 चे क्षेत्र 14 हे 31 आर ही नाशिक महानगरपालिकेची जागा आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याकरिता भुजबळांच्या प्रयत्नातून नाशिक महानगरपालिकेचा ठराव करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी ही जागा वैद्यकीय महाविद्यालयास देण्याकरिता नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. मात्र, या जागेचे मूल्यांकन 20 कोटी 3 लाख 40 हजार म्हणजे 50 लाखांपेक्षा अधिक असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांपर्यंत 12 मे 2022 रोजी महसूल विभागाला प्रस्ताव सादर केला असून, सदर प्रस्ताव महसूल विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. संस्थेच्या ताब्यात असलेल्या 20.47 हेक्टर जागेलगतची 14.31 हेक्टर जागा उपलब्ध होण्याच्या अधीन राहून या बांधकामास परवानगी देण्यात येत आहे. तसेच बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबत पूर्तता करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले

हेही वाचा:

The post नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयासह 430 खाटांच्या रुग्णालय बांधकामास मान्यता appeared first on पुढारी.