नाशिकमध्ये आयात उमेदवारच निवडणूक मैदानात उतरविण्याचे संकेत

राज ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कधीकाळी बालेकिल्ला राहिलेल्या नाशिकमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर मनसेचा उमेदवार जवळपास निश्चित झाला असून, आयात उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरविला जाणार असल्याची माहिती मनसेच्या गोटातून मिळत आहे. तसेच युती किंवा आघाडीसोबत न जाता, या निवडणुकीतही मनसे ‘एकला चलो’चा नारा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याने, जागा वाटप, उमेदवारीवरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये घमासान बघावयास मिळत आहे. अशात मनसेची भूमिका गुलदस्त्यात असल्याने, पक्षप्रमुख राज ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. सध्या राज ठाकरे पक्षाच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असून, आपल्या तीनदिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी श्रीकाळारामाची सहकुटुंब आरती केली. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना, कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठीही त्यांनी हजेरी लावली. तसेच लाेकसभेसाठी इच्छुक असलेल्या आध्यात्मिक क्षेत्रातील उमेदवारालाही त्यांनी वेळ देत बैठक घेतल्याने, मनसेचा उमेदवार निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आता पक्षात रंगू लागली आहे. वास्तविक, शुक्रवारी (दि. 8) दुपारीच ही बैठक होणार होती. मात्र, दिवसभरातील नियोजित कार्यक्रमांमुळे रात्री उशिरा हॉटेल एक्स्प्रेस इन येथे ही बैठक पार पडली.

आगामी लोकसभेसाठी इच्छुक असलेले बहुतांश उमेदवार मनसेच्या वाटेवर आहे. त्यातील एका भाजपच्या इच्छुकाची मधल्या काळात चर्चाही रंगली होती. मात्र, ही चर्चा हवेत विरल्यानंतर आता आध्यात्मिक क्षेत्रातील इच्छुकाने मनसेचा झेंडा हाती घेण्याचे जवळपास निश्चित केले आहे. या उमेदवारावर शिक्कामोर्तब केला जाण्याची दाट शक्यता असून, शनिवारच्या (दि. ९) सभेत राज ठाकरे यांच्याकडून याबाबतची विस्तृत घोषणा केली जाईल, असाही तर्क लावला जात आहे.

मागील दौऱ्यातच दिले होते संकेत

गेल्या महिन्यात नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आयात उमेदवाराचे मनसेचे मिशन लाेकसभा असणार असल्याचे संकेत दिले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिवावर अपयश पदरात पाडून घेण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. त्यानुसारच मनसे आयात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.

…अन् १५ मिनिटे थांबा ताफा

सातपूर येथे सायंकाळच्या सुमारास नियोजित शाखा उद्घाटनाला जात असतानाच रस्त्यातच राज ठाकरे यांचा ताफा अचानकच थांबला. तब्बल १५ मिनिटे राज ठाकरे यांचा ताफा थांबल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात होते. राज यांना महत्त्वाचा फोन आल्याने, त्यांचा ताफा थांबल्याची चर्चा आहे. मात्र, फोन कोणाचा होता किंवा ताफा का थांबला याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये आयात उमेदवारच निवडणूक मैदानात उतरविण्याचे संकेत appeared first on पुढारी.