नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम

नाशिक थंडी, (संग्रहित) www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे दोन दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरातील तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास येऊन ठेपला आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दरम्यान, निफाडमध्येही पारा ७.६ अंशांवर स्थिर आहे.

हिमालयातील बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पारा ५ अंशांखाली घसरला आहे. थंडीच्या लाटेने उत्तर भारत गारठून गेला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग अधिक असल्याने चालू वर्षाच्या प्रारंभीच नाशिकच्या पारा १० अंशांपर्यंत खाली आला आहे. शहर व परिसरात मध्यरात्री थंडीचा जोर अधिक जाणवत असून, पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दवबिंदुंमुळे शहर धुक्यात हरवत आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा आधार घेतला जात असून, निरनिराळ्या ठिकाणी शेकोट्यांभोवती गर्दी होत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेषत: निफाडमध्येही गारठा वाढला आहे. पारा ८ अंशांखाली असल्याने तालुक्यात दिवसभर थंडीचा जोर जाणवत आहे. हवामानातील या बदलामुळे तालुकावासीय गारठून गेले आहेत. तसेच या हवामानापासून दुभत्या जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठ्यांमध्ये शेकोट्या पेटविल्या जात आहेत. उर्वरित जिल्ह्यातही थंडीचा कडाका कायम आहे. अचानक थंडीत झालेल्या वाढीचा फायदा रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांसाठी उपयुक्त आहे. त्याचवेळी द्राक्ष, टोमॅटो, कांदापिकासह अन्य शेतीमालाला फटका बसू शकतो. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याच्या पाऱ्यात अधिक घसरण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम appeared first on पुढारी.