नाशिकमध्ये सरींवर सरी, चोवीस तासांत १० मिमी पावसाची नोंद

नाशिक पाऊस, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहर व परिसरात मंगळवारी (दि.२७) सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने नाशिककर सुखावले आहेत. दिवसभर मध्यम ते जोरदार सरी कोसळल्याने हवेतील उष्मा नाहीसा झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाऊस झाल्याने बळीराजा आनंदी आहे. दरम्यान, आगामी पाच दिवस जिल्ह्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

लांबलेल्या पावसाने जूनच्या अखेरीस नाशिकमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. दोन दिवसांपासून त्याने संपूर्णत: जिल्हा व्यापला आहे. सर्वत्र आशादायक चित्र निर्माण झाले आहे. शहर व परिसरात मंगळवारी (दि.२७) पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. दुपारी काहीकाळ जोरदर सरी बरसल्या. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच शहरातील रस्ते जलयम झाले. रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्यातून मार्गक्रमण करताना शहरवासीयांची कोंडी झाली. तसेच स्मार्ट सिटी व महानगर गॅस पाइपलाइनच्या कामांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, दुचाकी वाहनांचे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या काळात १०.७ मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या चार तालुक्यांत त्याने जोर धरला आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवनावर काहीसा परिणाम झाला आहे. दुसरीकडे अन्यही तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. उशिराने का होईना आभाळमाया झाल्याने बळीराजा सुखावला आहे. परंतु, तूर्तास तरी हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या पर्जन्यासाठी प्रतीक्षा करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, सकाळी आठपर्यंत संपुष्टात आलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ६.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये सरींवर सरी, चोवीस तासांत १० मिमी पावसाची नोंद appeared first on पुढारी.