नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाढती अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांविषयी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर अतिक्रमण नूिर्मलन विभाग अॅक्शन मोडवर आला असून येत्या मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून शहरातील दोनशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर टप्प्याटप्प्याने हातोडा मारला जाणार आहे. अतिक्रमण निमूर्लन विभागासह बांधकाम, नगररचना विभागांमार्फत संयुक्तरित्या ही कारवाई केली जाणार असून यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे.

एकीकडे अनधिकृत होर्डीग्जमुळे शहराला बकालावस्था आली असताना रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गल्लीतील ‘भजीपाव दादा’ ते दिल्लीतील बड्या नेत्यांच्या स्वागत, वाढदिवसाची अनधिकृत फलके ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ची वाटचाल अडचणीत आणणारे ठरले आहेत. या अनधिकृत फलकांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच रस्त्यावरील विक्रेत्यांची अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. करंजकर यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत चिंता व्यक्त केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभाग अॅक्शन मोडवर आला आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात नगररचना विभागाकडून प्राप्त प्रकरणांची विभागनिहाय यादी अतिक्रमण निमूर्लन विभागाने तयार केली असून संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही संबंधित बांधकामे कायम असल्याने अखेर या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी फिरवण्याची तयारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने केली आहे. या बांधकामांच्या निष्कासनाच्या आदेशांवर उपायुक्त नितीन नेर यांनी स्वाक्षरी केली असून येत्या मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून विभागनिहाय कारवाईला सुरूवात केली जाणार आहे. अतिक्रमण नूिर्मलन विभागासह बांधकाम, नगरनियोजनचे अधिकारी, इलेक्ट्रीशियन, प्लंबर आदी या मोहिमेत सहभागी असणार आहेत. अनधिकृत बांधकामे हटविल्यानंतर संबंधित अनधिकृत बांधकामधारकांकडून दंडात्मक शुल्कही आकारला जाणार आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांवर मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून विभागनिहाय कारवाईला सुरूवात केली जाणार आहे. अनधिकृत बांधकामधारकांनी आपापली बांधकामे स्वत:हून काढून घ्यावी. महापालिकेची कटू कारवाई टाळावी.

– नितीन नेर, उपायुक्त, अतिक्रमण निमूर्लन

हेही वाचा :

The post नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा appeared first on पुढारी.