नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली!

tarbuj www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसंस्था
पारंपरिक पिकांना फाटा देऊन निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मच्छिंद्र कारभारी टोपे या शेतकर्‍याने घेतलेले टरबुजाचे पीक अवकाळीने हिरावल्याने मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

अवकाळीपूर्वी टरबूज चांगल्या अवस्थेत होते. ही शेती गारपिटीपासून वाचल्याचेही दिसून येत होते. आतून भडक लाल आणि चवीला गोड असणार्‍या या फळाला गारपिटीचा फटका बसल्याने आता ते खराब होऊ लागले आहेत. हिरव्या टरबुजावर पांढरे डाग पडत असून, पीक खराब होत आहे. त्यामुळे गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, कांद्यानंतर आता टरबुजाच्या शेतीलाही बसल्याचे समोर आले आहे. निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील मच्छिंद्र कारभारी टोपे या शेतकर्‍याने शेतात वेगळा प्रयोग करत कलिंगडाची शेती केली होती. 80 ते 90 हजार रुपये खर्च करून एक एकरामध्ये टरबुजाचे पीक जोमदार घेतले होते. अचानक झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे टरबुजाला फटका बसल्याने त्यावर डाग पडण्यास सुरुवात झाली आहे. व्यापारीही आता ते टरबूज घेण्यास तयार नसल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. संपूर्ण पीक वाया गेल्यामुळे ते काढून फेकण्यासाठीही मजुरी नसल्याचे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : अवकाळीने हरवली टरबुजाची लाली! appeared first on पुढारी.