नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे

अवकाळी पाऊस, द्राक्ष नुकसान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात दि. ७ ते १६ एप्रिल या कालावधीतील अवकाळीमुळे ३७ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मातेरे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये ३०,३२३ हेक्टरवरील कांदा व कांदा रोपांचा समावेश आहे. गावोगावी पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या आठ दिवसांपासून राज्याला अवकाळीने तडाखा दिला आहे. नाशिक जिल्ह्यालाही वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने झाेडपून काढले. जिल्ह्यात दि. ७ ते १६ एप्रिलदरम्यान झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतले आहे. त्यासाठी कृषीची मदत घेण्यात येत आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार ७८० गावांमधील ३७ हजार ९८२ हेक्टर पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे ६६ हजार ९२३ शेतकरी बाधित झाले आहेत.

जिल्ह्यात ३३ हजार ८०५.५ हेक्टर बागायत क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे. तसेच ४ हजार १७६.२९ हेक्टर बहुवार्षिक पिके पावसाच्या तडाख्यात सापडली आहेत. अवकाळीचा सर्वाधिक फटका कांदापिकाला बसला आहे. त्याखालोखाल 2645 हेक्टरवरील द्राक्षपिकांची नासाडी झाली. तसेच 1716 हेक्टरवरील भाजीपाला, 997.47 हेक्टर डाळींब, 723.80 हेक्टरवरील गहू, 501 हेक्टर आंबा, 381 हेक्टर मका पाण्यात गेला आहे. या व्यतिरिक्त टोमॅटो, बाजरी, भुईमूग, लिंबू यासह अन्य पिकांचेही नुकसान पावसाने झाले आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत पंचनामे पूर्ण हाेण्याची शक्यता आहे.

-अवकाळी, गारपिटीचा 780 गावांना फटका

-जिल्ह्यातील 66,923 शेतकरी बाधित

-33,805.5 हेक्टर बागायती पिकांची नासाडी

-2,645.07 हेक्टर बहुवार्षिक पिके पाण्यात

हेही वाचा :

The post नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे appeared first on पुढारी.