नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर

सोशल मीडिया पोस्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात काही ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात हा प्रकार घडू नये, यासाठी सायबर पोलिसांनी इंटरनेटवरील गस्त वाढवली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाने आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे आक्षेपार्ह पोस्ट वा मजकूर अपलोड करणाऱ्या व्यक्तीची माहिती त्वरित सायबर पोलिसांना मिळत आहे.

कोल्हापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे शहर पोलिसांनी खबरदारी म्हणून सोशल मीडियावर लक्ष केंद्रित केले आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलिसांनी घोटी पोलिसांत एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक आयुक्तालयाने सोशल मीडिया वापरकर्त्यांना सतर्क राहण्यासह आक्षेपार्ह मजकूर अपलोड न करण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था कायम असून, सायबर गस्तीनुसार सर्वांच्या प्रोफाइल्सवरील पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वीच एका विशिष्ट सॉफ्टवेअरची खरेदी नाशिक पोलिसांनी केली आहे.

आयुक्तालह हद्दीसह इतरत्र आक्षेपार्ह मेसेज व पोस्ट टाकल्यास त्याची माहिती त्वरित पोलिसांना मिळत आहे. यासह गोपनीय यंत्रणाही सतर्क असून, त्यांची गस्त संवेदनशील परिसरात सुरू आहे. शहरातील १४ पोलिस ठाण्यांसह विशेष शाखा, गुन्हे शाखा पथके, अंमली पदार्थविरोधी, खंडणीविरोधी, दरोडा व शस्त्रविरोधी, गुंडाविरोधी पथक सतर्क झाले असून, ते शहरातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

ट्विटरला नोटीस

कतारमधील खाते असलेल्या एका ट्विटर हँडलवर महापुरुषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट आढळल्याने सायबर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. संबंधित पोस्टला रिप्लाय करीत कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच ट्विटरलाही यासंदर्भात नोटीस पाठवून अशा प्रकारचा वादग्रस्त मजकूर त्वरित हटविण्याची सूचना केली आहे. पोलिसांनी सॉफ्टवेअरद्वारे त्या पोस्टसहित खात्याचा माग काढला. शनिवारी (दि. १०) दुपारनंतर संबंधित ट्विटर खाते लॉक झाल्याचे दिसले.

The post नाशिक : आक्षेपार्ह पोस्ट शोधण्यासाठी नाशिक पोलिसांचे सॉफ्टवेअर appeared first on पुढारी.