नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी

कालिकादेवी मंदिर नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार (दि. 26) पासून प्रारंभ होत असून, घरोघरी घटस्थापना करण्यात येणार आहे. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकामाता तसेच पंचवटीतील सांडव्यावरील देवीसह शहरातील इतर देवीमंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. वातावरणात सर्वत्र चैतन्य आणि मांगल्य पसरले आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. घरोघरी घटस्थापना करून नऊ दिवस स्त्री शक्तीचा जागर करण्याचा हा उत्सव असून, त्यासाठी नाशिककरांनी जय्यत तयारी केली आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकामाता मंदिरात सकाळी 7 च्या सुमारास घटस्थापना करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त उत्सव साजरा केला जाईल. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून मंदिर व्यवस्थापन समितीने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पंचवटीमधील सांडव्यावरील देवी हे नाशिककरांचे आराध्य दैवत आहे. नवरात्रोत्सवासाठी या मंदिर परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. भगवतीच्या मूर्तीला साजशृंगारांसह सोने-चांदीची विविध आभूषणे परिधान करण्यात येणार आहेत. तसेच उत्सव काळात मंदिरात दररोज नवचंडी पाठ, कुमारिका पूजन, गोंधळ व महिला भजनी मंडळांचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय जुन्या नाशिकमधील भद्रकाली देवी, घनकर गल्लीतील तुळजा भवनीमाता, नाशिकरोडचे देवी मंदिर, लवाटेनगरमधील महालक्ष्मी आणि भगूर येथील श्री रेणुकामाता मंदिर येथेही नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक सजावट केली आहे. तसेच नऊ दिवसांच्या कालावधीत निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडपांमध्येही प्राणप्रतिष्ठा
कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर सार्वजनिक मित्रमंडळांनीही नवरात्रीची जोरदार तयारी केली आहे. शहरातील शेकडो सार्वजनिक मंडळांच्या मंडपांत देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने नऊ दिवस गरबा व दांडियांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार फरांदे यांच्या हस्ते घटस्थापना
श्री कालिकादेवी मंदिरात आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी दिली आहे. सोमवारी (दि. 26) पहाटे 3 वाजता काकड आरती, तर पहाटे 5 ला विश्वस्तांच्या हस्ते घटपूजन करण्यात येणार आहे. सकाळी 7 वाजता आ. देवयानी फरांदे यांच्या हस्ते घटस्थापना, महापूजा आणि आरती करण्यात येणार आहे. सकाळी 8 ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती, तर सकाळी 9 वाजता नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता श्रींना नैवेद्य अर्पण व आरती, दुपारी 1 ते 5 महिला मंडळांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता मंगल वाद्यांचा गजर व रात्री 12 वाजता महाआरती होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : आज घटस्थापना, मंदिरांसह घरोघरी तयारी appeared first on पुढारी.