नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई

रविवार कारंजा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकांनी बांधकामस्थळी रस्ते खोदाईसह, इमारतीसाठी खोदाई करू नये, तसेच तळघरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, याबाबतचे आदेश महापालिकेच्या नगर नियोजन विभागाकडून काढण्यात आले आहेत.

गतवर्षी एका बांधकाम व्यावसायिकाने ऐन पावसाळ्यात बांधकामस्थळी केलेल्या खोदाईमुळे रस्ता खचला होता. या घटनेत सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र, रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने महापालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकास दंड ठोठावला होता. हा सर्व प्रकार लक्षात घेता यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या नगर नियोजन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले असून, इमारतीसाठीची खोदाई, तळघराची खोदाई तसेच रस्ते खोदाईला मनाई करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत व बांधकाम परवानगी पत्रामध्ये नमूद केलेल्या अटी-शर्तीनुसार संबंधित बांधकाम व्यावसायिकास आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना, जीवितहानी न होण्याच्या दृष्टीने खबरदारी व उपाययोजना करणे बंधनकारक असणार आहे.

उपाययोजनेत काही त्रुटी राहिल्यास तसेच जीवितहानी व वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही विकासकाची, आर्किटेक्ट व स्ट्रक्चरल इंजिनिअर यांची राहणार आहे. त्यामुळे बांधकामस्थळी त्यादृष्टीने उपाययोजना करताना खबरदारी घेण्यात यावी, असेही नगर नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, याबाबतचे पत्र बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई, नरेडको, सर्व वास्तुविशारद, अभियंते, सुपरवायझर यांना पाठविण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतच्या उपाययोजना करणे अत्यावश्यक असून, कोणतीही जीवित तसेच वित्तहानी होऊ नये या त्यामागील हेतू आहे. बांधकाम व्यावसायिकांनी त्यादृष्टीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. – एस. एल. अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगर नियोजन विभाग.

हेही वाचा:

The post नाशिक : आता पावसाळ्यात बांधकामस्थळी खोदाईला सक्त मनाई appeared first on पुढारी.