नाशिक : उत्पन्नवाढीसाठी पावती अभिषेकाचा पर्याय; त्र्यंबकेश्वर विश्वस्तांची माहिती

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

सशुल्क दर्शनाचा वाद न्यायालयात पोहोचला असताना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. त्याचे दरपत्रक संस्थानच्या अधिकृत वेबपोर्टलवर प्रसिद्ध करत बुकिंगसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. देवस्थान ट्रस्ट भविष्यात पावती अभिषेक सुरू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भक्तांच्या मागणीप्रमाणे पूजा, नैवेद्य, पालखीसाठी देणगी स्वीकारणे सुरू केले असल्याची माहिती एका विश्वस्ताने दिली.

देवस्थान ट्रस्टने दररोज देवाला शृंगार करण्यासाठी लागणारे बेल आणि फुले, दररोजचा नैवेद्य, सोमवारची पालखी, दसऱ्याची पालखी यासाठी भक्तांमधून प्रायोजक शोधणे सुरू केले आहे. दररोजचा शृंगार, बेल-फुले इत्यादींसाठी पाच हजार 1 रुपये, सोमवारच्या पालखी शृंगारासाठी 11 हजार रुपये, दसरा व महाशिवरात्री पालखी शृंगारासाठी 21 हजार रुपये, दररोजचा नैवेद्यासाठी तीन हजार 100 रुपये देणगी असे दर ठरविण्यात आले. परंतु याबाबत विश्वस्तांमध्येच नाराजी आहे. त्यांनी याबाबत आक्षेप नोंदवला असून, अशा प्रकारे आकारणी योग्य नाही, असे मत खासगीत व्यक्त केले आहे. तर एका विश्वस्त सदस्याने भाविकांच्या मागणीनुसार देणगी पर्याय सुरू केला आहे. देणगी देताना नैवेद्यासाठी अथवा शृंगारपूजेसाठी भाविक अनेक वर्षांपासून पावती करत आहेत, अशी टिप्पणी केली. तर पारंपरिक व्यवस्था पूर्णतः मोडीत निघण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

दोनशे रुपये दर्शनपद्धत बंद करावी आणि भक्तांमधील भेदभाव दूर करावा, अशी माझी मागणी आहे. त्यात आता पूजा, शृंगार, पालखीसाठी पैसे घेणे सुरू केल्याने बाजारीपणा आला आहे. देवस्थान ट्रस्टला वतनाच्या जमिनी आणि शासन अनुदान असताना दरपत्रक जाहीर करणे चुकीचे आहे. – ललिता शिंदे, माजी विश्वस्त व याचिकाकर्त्या.

भक्तांनी दिलेल्या देणगीतून ट्रस्टचा कारभार सुरू आहे. परंतु दिवसेंदिवस खर्चात वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील रमादेवी ट्रस्ट या संस्थेच्या प्रेरणेने एका दिवसाचे 150 रुपये याप्रमाणे संपूर्ण वर्षासाठी देणगी दिली जाते. दर महिन्याला 4500 रुपयांची पावती केली जाते. अनेक वर्षांपासून ही देणगी सुरू आहे. येथील संजय दीक्षित यांनी ही माहिती दिली.

भक्तांच्या मागणीप्रमाणे पूजा, नैवेद्य, पालखी यासाठी देणगी स्वीकारणे सुरू केले आहे. भाविकांच्या इच्छा असतात, नवस संकल्प असतात, त्या उद्देशाने ट्रस्टने निर्णय घेतला आहे. – भूषण अडसरे, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट.

हेही वाचा:

The post नाशिक : उत्पन्नवाढीसाठी पावती अभिषेकाचा पर्याय; त्र्यंबकेश्वर विश्वस्तांची माहिती appeared first on पुढारी.