नाशिक : उमेदच्या रानभाज्या, राखी महोत्सवाला १० हजार नाशिककरांची भेट

रानभाज्या महोत्सव, www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

गावरान ठेचा… नागली, ज्वारी, बाजरीची चुलीवर भाजलेली भाकरी… हातमागाच्या वस्तू… भरड धान्यांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू त्यादेखील ग्रामीण धाटणीच्या… हे चित्र आहे नाशिक पंचायत समितीच्या आवारातील. सोमवार पासून या ठिकाणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरले आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी नाशिककर तुडुंब गर्दी करत आहे. गेल्या पाच दिवसांत जवळपास १० हजार नाशिककरांनी या ठिकाणाहून वस्तू खरेदी केल्या असून, गेल्या पाच दिवसांत एकूण उलाढाल तब्बल पाच लाख ५७ हजार एवढी झाली असल्याची माहिती ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.

पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गेल्या सोमवारी (दि. १४) या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत झाले. स्वातंत्र्य दिन आणि पतेती अशा लागून सुट्या आल्याने नाशिककरांची पावले या महोत्सवाकडे वळली. याठिकाणी असलेल्या आकर्षक हातमागाच्या वस्तू, तत्त्व या ग्रामीण महिलांच्या ब्रँडने तयार केलेले सुती कपडे, साड्या तसेच पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागामध्ये तयार होणारे रानभाज्या, भरड धान्यापासून केक, डोसा, चटणी यांचे प्रिमिक्स, नागलीचे बिस्कीट आदी गोष्टींना भरपूर मागणी आहे.

महोत्सवाच्या माध्यमातून अनेक बचतगटांच्या महिलांना बाजारपेठ मिळाली आहे. आपण तयार केलेले प्रॉडक्ट जनतेसमोर जात आहे, त्यासाठी कोणतीही जाहिरातबाजी करावी लागत नसल्याने या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

आमचा सरस्वती महिला बचतगट आहे. या ठिकाणी आम्ही थालिपीठ आणि कांदाभजी विक्री करतो. पापड, कुरडई यांचादेखील स्टॉल आहे. या स्टॉलला भाडे नाही. पाच दिवसांत १२ ते १३ हजार रुपये कमाई झाली आहे. असे महोत्सव नियमित व्हायला हवे, जेणेकरून एक रोजगार मिळेल.

देवयानी पाटील, महिला विक्रेती

 

महिलांकडे कला कौशल्य आहे. त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध केले, तर त्यांच्यातील उद्योजिका जागी होईल. हा त्यांच्यासाठी केलेला हा छोटा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह होईल. नाशिककरांना आवाहन आहे की, ३० तारखेपर्यंत हा महोत्सव आहे. सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि महिलांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ बघावे, विकत घ्यावे.

-प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : उमेदच्या रानभाज्या, राखी महोत्सवाला १० हजार नाशिककरांची भेट appeared first on पुढारी.