नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार

कांदा अनुदान,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कांद्याबाबत विविध आंदोलने, नाफेडची मध्यस्थी, व्यापाऱ्यांना बंद अशा घटना घडत असतानाच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून, या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समितीमध्ये तसेच नाफेडकडे कांदा विकला आहे, अशा शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान २०० क्विंटलच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आणि काहीतरी भरपाई भरून निघेल म्हणून शेतकऱ्यांनीदेखील बाजारभाव मूल्याचा विचार न करता मिळेल ते पदरात पाडून घेत जाहीर केलेले अनुदान मान्य करीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
दरम्यान, शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव सादर केले होते, त्या प्रस्तावांची छाननी होऊन १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आयसीआयसीआय बॅंकेच्या पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार appeared first on पुढारी.