नाशिक : कृषी विभागाने केले १३ लाखांचे बोगस बियाणे जप्त

कृषी विभागाची धाड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची मान्यता नसलेल्या व मुदत बाह्य बियाण्यांवर मोठी कारवाई केली आहे. जिल्हा भरारी पथकाने शहरातील द्वारका परिसरातील एका दुकानात धाड टाकत मुदत बाह्य कांदा पिकाचे ४४२.५ किलो बियाने जप्त केले आहे. जिल्हा कृषी विभागाने केलेल्या या कारवाईने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर बोगस, मुदतबाह्य बियाने विकणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

दोन दिवसांपुर्वी कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे द्वारका परिसरातील मे.अभिजीत सीडस प्रा ली या बियाणे कंपनीत मान्यता नसलेला तसेच मुदत बाह्य कांदा पिकाचे सुमारे 500 ग्रॅमचे 885 पाकिटे (442.5 किलो बियाणे) जप्त केले. जप्त केलेल्या बियाण्यांची किंमत सुमारे 13 लक्ष 7 हजार 680 रुपये एवढी आहे. तपासणीच्या वेळेस सदरचे बियाणे विक्रीकरिता पॅकिंग करीत असल्याचे आढळले.

कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ यांच्या नेतृत्वात जिल्हा भरारी पथकातील जगदीश पाटील, कृषी उपसंचालक संजय शेवाळे, तंत्र अधिकारी (गुनि) तसेच मोहीम अधिकारी अभिजीत जमधडे, अभिजीत घुमरे, तंत्र अधिकारी नितेंद्र पाणपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जगन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या धाडीनंतर भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईस विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक विवेक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

The post नाशिक : कृषी विभागाने केले १३ लाखांचे बोगस बियाणे जप्त appeared first on पुढारी.