नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात खबरदारी म्हणून मंगळवारी (दि.27) देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल करण्यात आले. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. रुग्णालयामधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ही सर्व माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकारने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, याची खात्री करण्यासाठी मंगळवारी, (दि.27) जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णालयात आल्यानंतर प्राथमिक उपचारापासून अंतिम टप्प्यापर्यंत रुग्णावर उपचारपद्धतीबाबत आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे आयसोलेशन बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटरसारख्या सुविधांची तपासणी करण्यात आली.

पाच पातळ्यांवर तपासणी
मॉकड्रिलमध्ये पाच टप्प्यांमध्ये आढावा घेण्यात आला. यात ऑक्सिजन प्लांटची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या टाक्यांची परिस्थिती पाहण्यात आली. ऑक्सिजन भरण्यासाठी किती कालावधी लागतो याचाही आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन बेडजवळील पाइपलाइन, रुग्णवाहिकांची माहिती तसेच औषधांच्या साठ्याची माहिती संकलित करण्यात आली. ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, खबरादारी घेणे गरजेचे आहे. ऑक्सिजन प्लांटपासून ते डॉक्टर, मेडिकल, स्टाफ, व्हेंटिलेटर, कॉन्सन्ट्रेटर यासारख्या सुविधांची व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. संभाव्य धोका लक्षात घेता सर्व रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली. – डॉ. अनंत पवार, कोरोना नोडल अधिकारी.

हेही वाचा:

The post नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल appeared first on पुढारी.