नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी

कोरोनाच्या नव्या साथीत स्टेरॉईडस्चा वापर टाळा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात खबरदारी म्हणून उपचारांसोबत संशयित रुग्णांची तपासणी वाढवण्यावर भर देण्यात आला होता. त्यानुसार मार्च २०२० ते २१ मार्च २०२३ या कालावधीत तब्बल ३६ लाख ३४ हजार ७०३ संशयित नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यांपैकी १३.२८ टक्के म्हणजेच ४ लाख ८२ हजार ५६६ रुग्ण बाधित आढळले. तर ८ हजार ९०४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच परदेशातील नागरिक पुन्हा घराकडे परतू लागले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात आली होती. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसताच संबंधितांची कोरोना चाचणी केली जात होती. दरम्यान, २३ मार्च २०२० मध्ये राज्यभरात खबरदारी म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन बंद झाले होते. मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात पहिला बाधित आढळून आला. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ४२ हजार ४५२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १ लाख २२ हजार ८१० कोरोनाबाधित आढळून आले, तर २ हजार १०५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर १ मार्च २०२१ ते २२ मार्च २०२२ या कालावधीत २८ लाख ४ हजार ६८३ संशयित नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात तीन लाख ५३ हजार १८२ कोरोनाबाधित आढळून आले, तर ६ हजार ७९४ बाधितांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लसीकरण, रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली. २३ मार्च २०२२ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यात २ लाख ८७ हजार ५६८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ६ हजार ५७४ बाधित आढळून आले, तर त्यांपैकी ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कोरोनाने घेतला जिल्ह्यातील ९ हजार बाधितांचा बळी appeared first on पुढारी.