नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी (दि.२२) मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांना फैलावर घेतले. तुम्ही याच शहराचे नागरिक आहात ना मग अशा प्रकारची कामे करणे तुम्हाला शोभते का असा प्रश्न करत आयुक्तांनी खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती न केल्यास संबंधीत ठेकेदारांना अंतिम नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.

महापालिकेने गेल्या तीन वर्षात डांबरीकरण, खडीकरण तसेच काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर सुमारे सातशे कोटी रूपयांचा खर्च केला आहे. परंतु, पावसामुळे शहरातील रस्त्यांचे खरे पितळ उघडे पडले. शहरात आज असा एक रस्ता नाही की त्यावर खड्डे पडलेले नाहीत. दोष निवारण कालावधी अर्थात डिफेक्ट लायबिलीटीतील रस्तेही खड्डेमय झाले आहेत. गेल्या सहा ते तीन महिने कालावधीत तयार केलेल्या नवीन रस्त्यांवरही खड्डे पडल्याने रस्त्यांच्या कामाबाबतच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह शहरातील जागृत नागरिकांनी खड्ड्यांबाबत मनपाला जाब विचारत गणेशोत्सवापूर्वीच रस्ते दुरूस्तीची मागणी केली आहे. यासंदर्भात आयुक्तांनी तक्रारींची दखल घेत सोमवारी (दि.२२) बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदारांची एकत्रित बैठक घेतली. बैठकीत आयुक्तांनी ठेकेदारांना उभे करत, त्यांच्याकडूनच शहरातील खड्ड्यांबाबत माहिती घेतली. दोष निवारण कालावधीतील रस्ते किती, तुम्ही रस्त्यांवर फिरलेत का, रस्त्यांवर खड्डे किती आहेत असे प्रश्न विचारत ठेकेदारांनी दिलेल्या माहितीची समोरच बसलेल्या अभियंत्यांकडून पडताळणी करून घेतली. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवाआधी शहरातील रस्ते चांगले करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

आयुक्तांकडून नियमावलीचे स्मरण : आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागातील अभियंत्यांना रस्ते कामांची तपासणी व गुणवत्ता कशी तपासावी याबाबतच्या नियमावलीचे स्मरण करून दिले. रस्त्यांची कामे सुरू असताना घेतले जाणारे नमुने ठेकेदाराच्या माणसाकडून नव्हे, तर अभियंत्यांनीच क्वाॅलिटी कंट्रोल विभागाकडे घेऊन जाण्याचे व त्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

तीन वर्षाच्या कामांचा अहवाल द्या : महापालिकेकडे गुणवत्ता नियंत्रण विभाग असूनही हा विभाग नेमके काय करतो असा प्रश्न करत बांधकाम विभागासह गुणवत्ता नियंत्रण विभागाने गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आदेशनही डॉ. पुलकुंडवार यांनी दिले. दोष निवारण कालावधीतील रस्त्यांचीही माहिती आयुक्तांनी मागविली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : खड्ड्यांवरून आयुक्तांकडून अधिकाऱ्यांसह ठेकेदार फैलावर appeared first on पुढारी.