नाशिक: खोक्यांचे आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा! – खा. श्रीकांत शिंदे

shinde www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शिवसेना-भाजप सरकारने नऊ महिन्यांत विविध लोकोपयोगी निर्णय घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता गेल्यामुळे काही जणांना उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व झोपेतही खोक्याचे स्वप्न पडतात, असे टीकेचे बाण खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर सोडले. खोक्यांवरून आरोप करणाऱ्यांची एकदा नार्काे टेस्ट करून घ्या. जेणेकरून कोणाकडून कोणी किती खोके घेतले हे जगासमोर येईल, असे आव्हानही त्यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांचे नाशिकवर विशेष प्रेम असून, येथील विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील मायको सर्कल येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि. २) खा. शिंदे यांच्या हस्ते पार पडला. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बाेरस्ते व भाऊलाल तांबडे, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, श्यामला दीक्षित, योगेश म्हस्के, योगेश बेलदार, शोभा मगर आदी उपस्थित होते. डॉ. शिंदे पुढे म्हणाले, मविआ सरकारने कोविडच्या नावाखाली महाराष्ट्र कुलूपबंद केला. काेरोनाचे नाव पुढे करत स्वत: घरात काेंडून घेतानाच महाराष्ट्राच्या विकासासाठी एकही धोेरणात्मक निर्णय त्यांनी घेतला नाही, असा आरोप शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास काय असतो, हे दाखवून दिले आहे. नाशिकचे शिवसेना कार्यालय हे लोकोपयोगी ठरेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

ना. भुसे व आ. कांदे यांच्या प्रामाणिकपणामुळे आपण राज्यसभेत पोहोचलात, असा खोचक टोला खा. गोडसे यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच येत्या काळात शिवसेना कार्यालयाची ओळख संपूर्ण शहराला होईल, असा विश्वास व्यक्त केला. आ. कांदे यांनी जिल्ह्यातील १५ आमदारांसह नाशिकचा महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व नगरपालिकांत भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकात अजय बोरस्ते यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांना केले. येत्या काळात शहर-जिल्हा विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट शासनाला सादर केले जाईल. त्यासाठी मदत करावी, अशी विनंती बोरस्ते यांनी केली. याप्रसंगी जॅक्सनचा वध करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांचे वंशज, अयोध्येतील कारसेवक, काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभागी व्यक्तींचे नातेवाईक आदींचा डॉ. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांनी शिंदे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. त्यांनी आत्मपरीक्षण करावे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ५० आमदार, १३ खासदार व लाखो पदाधिकारी व कार्यकर्ते सोडून गेले. तरीही आम्ही गद्दार का, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित करत याबाबत आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: खोक्यांचे आरोप करणाऱ्यांची नार्को टेस्ट करा! - खा. श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.