नाशिक : गणरायाच्या सजावट साहित्याची ऑनलाइन विक्री, पूजेसाठी गुरुजीही ऑनलाइन होणार उपलब्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरले असून, घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याने यंदाच्या गणरायाची प्रतिष्ठापनाही खास असणार आहे. अशात ‘श्रीं’ची मूर्ती, सजावटीचे तसेच पूजा साहित्य विक्रीसाठी विक्रेत्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म निवडला असून, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, टि्वटरसह अन्य सोशल मीडियावर साहित्य विक्रीच्या जाहिरातींचा सपाटाच सुरू आहे.

काही विक्रेत्यांनी तर स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुक पेज तयार केले आहेत. यावर केवळ श्रींच्या प्रतिष्ठापनेला आवश्यक असलेल्या साहित्य विक्रीची जाहिरात केली जात आहे. सध्या शहरातील बहुतांश भागांत गणेशमूर्तींचे स्टॉल्स बघावयास मिळत असून, याठिकाणी अत्यंत आकर्षक अशा मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त ऑनलाइन पद्धतीनेदेखील गणरायाच्या आकर्षक मूर्तींचे फोटो भाविकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. सोबत उंची, रंग, आकार तसेच किमतीचा तपशील पाठविला जात आहे. एखाद्या भाविकाने मूर्ती घेण्यास रस दाखविल्यास तत्काळ बुकिंग केली जात आहे. दरम्यान, ग्राहकांना पारंपरिक रूपातील तसेच एक रंगातील मूर्ती अधिक पसंत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर दरवर्षी भाविक मोठ्या हौसेने आपल्या लाडक्या बाप्पाला विराजमान करण्यासाठी आकर्षक सजावट करतात. या सजावटीसाठी लागणार्‍या साहित्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे. दरम्यान, बहुतेक भाविकांचा कल तयार मखर घेण्याकडे आहे. तसेच बेडशीट्स, पडदे, लायटिंग, न विझणारे दिवे, केळीच्या खुंट्यासाठी स्टॅण्ड, आकर्षक विद्युत माळाही ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर मोदकही ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने, एका क्लिकवर ते उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून तरुणवर्ग या व्यवसायात उतरल्याने विक्रीसाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.

मेड इन इंडिया
चायना वस्तूंवर बंदी घातल्यानंतर ‘मेड इन इंडिया’च्या बर्‍याच वस्तू सध्या बाजारात दिसून येतात. छुप्या मार्गाने मेड इन चायना वस्तूंची विक्री केली जात असली, तरी मेड इन इंडियाच्या वस्तूंचे सध्या बाजारात वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. या वस्तू चायना वस्तूंच्या तुलनेत थोड्या महाग असल्या, तरी ग्राहकांकडून त्यास पसंती दिली जात आहे.

गुरुजीही ऑनलाइन उपलब्ध
गणरायाची प्रतिष्ठापना करताना ती विधिवत व्हावी, यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केले जातात. अशात विधिवत पूजेसाठी आवश्यक गुरुजीही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बहुतांश फेसबुक पेजवर आम्ही विधिवत पूजा करून देणार असल्याबाबतची गुरुजींची जाहिरात बघावयास मिळते. त्यामुळे भाविकांना आता गुरुजीही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : गणरायाच्या सजावट साहित्याची ऑनलाइन विक्री, पूजेसाठी गुरुजीही ऑनलाइन होणार उपलब्ध appeared first on पुढारी.