नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर

तुषार जगतापला जामिन,www.pudhari.news

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा

गुटखा तस्करी प्रकरणात अटक केल्यानंतर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला आहे. महिनाभरापूर्वी इगतपुरीत सव्वा कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत केल्याच्या गुन्ह्यातील तपासात जगतापचे मोठे ‘नेटवर्क’ उघड झाले आहे.

बुधवारी सांयकाळी तुषार जगताप याला इगतपुरी न्यायालयात हजर केल्यावर सरकारी वकीलांनी त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने तुषार जगतापला न्यायालयीन कोठडी सुनावली. तुषार जगतापच्या वकीलांनी लगेच जामीन अर्ज केल्याने न्यायालयाने १५ हजार रुपयांत त्वरीत जामीन मंजूर केल्याने तुषार जगताप जामीनावर बाहेर आला. तुषार जगताप हा राज्यातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्ती प्रकरणी दोन वर्षापासून फरार असलेला संशयित आरोपी राज किशनकुमार भाटियाला जयपूर येथून अटक केली होती. आरोपी राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हालवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. या तपासा दरम्यान राज भाटिया हा नाशिक येथील स्वयंघोषित आरोग्यदूत संशयित तुषार जगताप याच्या संपर्कात होता व त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटखा तस्करीचे नेटवर्क चालवत होता अशी माहिती पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळताच त्यांनी बुधवारी सकाळी तुषार जगताप याला अटक केली होती.

मुख्य सूत्रधार राज भाटिया याच्यासमवेत जगताप हा राज्यभरात अवैधरीत्या गुटखा विक्रीत ‘किंग’ म्हणून सक्रिय असल्याचे समोर आले आहे. २६ मे २०२३ रोजी इगतपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर दोन कंटेनर भरून सव्वा कोटींचा अवैध गुटखा हस्तगत केला होता. याप्रकरणात फरार असलेला मुख्य संशयित राज किशनकुमार भाटिया रा. जयपूर, राजस्थान याला पोलिसांनी २३ जून रोजी अटक केली. जयपूरमधून भाटियाला अटक केल्यावर त्याने जबाबात संशयित तुषार कैलास जगताप, वय ३६, रा. त्रिमूर्तीनगर, नाशिक याचे नाव उघड केले. त्यानुसार पोलिसांनी जगतापला अटक केली होती. संशयित भाटिया हा दिल्ली व जयपूरमधून सूत्रे हलवून बंद कंटेनरमध्ये देशातील विविध राज्यांत गुटख्याची तस्करी करायचा. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भाटिया पोलिसांच्या हाती तुरी देत होता. सन २०२१ पासून नाशिकचा जगताप हा भाटियाच्या संपर्कात आला. त्याने महाराष्ट्रातील गुटख्याचे नेटवर्क हातात घेतले. जगताप हा त्याच्या साथीदारांसह परराज्यातही तस्करी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

भाटियासह जगताप हे दोन ‘बडे मासे’ गळाला लागल्याने अवैध गुटखा विक्री व पुरवठ्याच्या मुळाशी जाणे पोलिसांना शक्य होणार होते. याप्रकरणी सखोल तपासाचे निर्देश पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना देण्यात आले आहेत. कोरोना काळात केलेल्या कामामुळे आरोग्यदूत म्हणून तुषार जगताप परिचित झाला होता. त्यातून त्याने एक वेब न्यूज पोर्टलही त्याने चालवण्यास सुरुवात केली आहे. त्याने शहरातल्या अनेकांना गंडा घातल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. गुटखा तस्करीच्या गुन्ह्यातील सखोल तपासात त्याचे इतर उद्योग समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर appeared first on पुढारी.