नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी

Gokul Pingle www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुळातच प्रचंड चर्चेत असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे आणखी लक्षवेधी ठरली आहे. माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यासह पिंगळे बंधूंंच्या दावेदारीमुळे या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

देविदास पिंगळे यांच्या प्रचाराचे संपूर्ण नियोजन पाहणारे गोकुळ पिंगळे यांनी स्वत:च यावेळी सोसायटी गटातून उमेदवारी केल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पिंगळे यांच्यासह पॅनलमधील उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळ पिंगळे यांच्या उमेदवारीचे अर्थ राजकीय निरीक्षक लावत आहेत. बाजार समितीच्या मतदारांमध्येही यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. बाजार समितीची निवडणूक सुरुवातीपासूनच नाट्यमय ठरली आहे. या समितीत पिंगळे आणि चुंबळे यांच्यात लढत दिसत असली तरी, महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटातील उमेदवार हे सर्वपक्षीय संबंधही ठेवून आहेत. चुंबळे यांनी जिल्हा बँकेप्रमाणे या निवडणुकीतही पिंगळेंसमोर आव्हान उभे केलेे आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटात असलेले गोकुळ पिंगळे यांना महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये उमेदवारीचा शब्द मिळाला होता, असे समजते. चर्चेअंती गोकुळ पिंगळे यांनी या पॅनलमार्फत अर्जही दाखल केला. परंतु, ऐनवेळी पॅनलमध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही स्वतः ची उमेदवारी मागे घेतल्याचे बोलले जाते. देविदास पिंगळे यांच्या राजकीय डावपेचांचे सूत्रधार मानले जाणाऱ्या गोकुळ पिंगळेंनी मांडलेली स्वतंत्र चूल आणि त्यांचा सोसायटी गटातील ७०० मतदारांशी असलेला वन-टू-वन संपर्क निवडणुकीवर परिणाम करेल काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारीचा लाभ कोणाला?
देविदास पिंगळे यांच्यासह काही संचालकांच्या अपात्रतेसंदर्भात पणनमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे, देविदास पिंगळे यांच्यासमोर चुंबळे गटाने तगडे आव्हान उभे केले आहे. अशा स्थितीत गोकुळ पिंगळे यांची उमेदवारी नेमकी कोणाला फायदेशीर ठरेल, यावर तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मी या निवडणुकीत उमेदवारी करीीत आहे. दोन्ही पॅनलशी माझा कोणताही संबंध नाही. -गोकुळ पिंगळे

हेही वाचा:

The post नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी appeared first on पुढारी.