नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान

गोदावरी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाराणसीच्या धर्तीवर पंचवटीमधील रामकुंड येथे गोदेची महाआरती करण्यात येणार आहे. रामकुंड परिसराचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ४२ कोटींचा निधी अपेक्षित असून, लवकरच त्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. महाआरतीमुळे गोदावरीचे पावित्र्य राखण्यासोबत पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. २८) गोदा महाआरतीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी आमदार देवयानी फरांदे व राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी आधिकारी सुमंत मोरे, पोलिस उपआयुक्त किरण चव्हाण, जलसंपदाचे अभियंता सागर शिंदे, गंगा-गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, शांतारामशास्त्री भानोसे आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी खर्च करून गोदेची आरती सुरू करण्यात येईल. येत्या दोन महिन्यांत ही आरती सुरू करण्यासंदर्भात प्रशासन आग्रही आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात गोदावरीचे पावित्र्य राखण्यासोबत ती अविरत वाहती राहावी म्हणून फिल्ट्रेशन प्लाॅन्ट उभारणे तसेच परिसरात लेझर शो, लाइट इफेक्ट्ससारखे काम होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्यात महाआरती उपक्रमाला प्रशासकीय मान्यता देतानाच आवश्यक साहित्य खरेदीसाठी १० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येईल, असे फरांदे यांनी सांगितले. दरम्यान, गोदाघाटावर सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाबाबत बैठकीत काहींनी नाराजी व्यक्त केली.

ट्रस्ट गठीत करणार

गोदा आरती हा पिढ्यानपिढ्या चालणारा उपक्रम आहे. त्यामुळे महाआरतीसाठी ट्रस्ट गठीत करण्याबाबत बैठकीत निर्णय घेतला. या ट्रस्टमध्ये आमदार व लोकप्रतिनिधींचा समावेश नसेल, अशी भूमिका आ. फरांदे व ढिकले यांनी घेतली. समितीमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांना समाविष्ट करून घ्यावे, अशी सूचना बैठकीत पुढे आली.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदावरी महाआरतीसाठी हालचाली गतिमान appeared first on पुढारी.