नाशिक : गोदेच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम

गोदावरी नदी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पाला गती देण्यासाठी नगररचना विभागाने पुढील चार दिवसांत गोदावरी पात्र व आजूबाजूच्या परिसराचा ड्रोन सर्वेक्षण अहवाल पुढील चार दिवसांत सादर करावा, असा अल्टिमेटम नूतन मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिला. या कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत नगररचना विभागाची त्यांनी कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. करंजकर यांच्याकडून चालू आठवड्यात महापालिकेच्या सर्व विभागांचा तपशीलवार आढावा घेतला जाणार आहे. सोमवारी (दि.३१) त्यांनी गोदावरी संवर्धन कक्ष व पर्यावरण विभागाचा आढावा घेतला. त्यात ‘नमामि गोदा’ प्रकल्प मुद्द्याला त्यांनी प्राधान्य देत तो कुठपर्यंत प्रगतिपथावर आहे, याबाबतची माहिती जाणून घेतली. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नमामि गोदा प्रकल्प राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जवळपास १,८०० कोटी रुपये देण्यास तत्त्वत: मान्यताही दिली आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने नदी स्वच्छता हा प्रमुख विषय असून, त्यासोबत नदीचे सौंदर्यीकरणही केले जाणार आहे.

या प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली असून, मागील जानेवारी महिन्यात आराखडा तयार करण्याचे काम दिले होते. तसेच व पुढील सहा महिन्यांत त्याची सादरीकरणाची अंतिम मुदत होती. त्यासाठी शहरातील पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था तसेच पावसाळी व्यवस्था व इतर नागरिकांना पुरविण्यात येणारे सुविधांचे जीआयएस मॅपिंग करून नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले गेले. यासाठी नगर नियोजन विभागाकडून ड्रोन सर्व्हे केले गेले. मात्र, या सर्व्हेचा कोणताही डाटा महापालिकेला प्राप्त झाला नसल्याने, याबाबतचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. तसेच त्यांनी नगररचना विभागाच्या लेटलतिफ कारभाराचा समाचार घेत पुढील चार दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करण्याची तंबी दिल्याची माहिती समोर येत आहे.

सुरक्षा जाळ्या लावाव्यात

गोदावरीसह तिच्या उपनद्यांवर छोटे-मोठे एकूण ५० पेक्षा जास्त पूल आहेत. नागरिकांकडून पुलावरून नदीत निर्माल्य व कचरा टाकून प्रदूषण केले जाते. ते पाहता १३ पुलांवर दोन्ही बाजूंनी जाळ्या लावाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डेटा करप्ट?

त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून केलेल्या ड्रोन सर्वेक्षणाचा डेटा टीबीमध्ये असून, तो करप्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा डेटा पुढील दोन दिवसांत रिकव्हर करून दिला जाणार असल्याचे संबंधित संस्थेने सांगितले असले तरी, तो होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदेच्या ड्रोन सर्वेक्षणासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.