नाशिक : चक्क वकिलालाच दिलं विमानाच बनावट तिकीट

विमान बनावट तिकीट www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अ‍ॅम्स्टरडॅम येथे मित्राकडे नाताळ सुटी साजरी करण्यासाठी विमानाचे तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने तिघांनी प्रतिष्ठित वकिलाची तब्बल लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

सप्तशृंगनिवासिनी ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. दीपक पाटोदकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा आर्यन याला त्याचा मित्र विश्वजित थोरात याने नेदरलँडमधील अ‍ॅम्स्टरडम येथे नाताळच्या सुटीसाठी बोलावले होते. त्यामुळे अ‍ॅड. पाटोदकर यांनी विमान प्रवासाचे तिकीट मुंबई नाका येथील व्हीआयपी शॉपिंग सेंटरमधील अ‍ॅम्बल हॉलिडेजमधून काढले. मुंबई-अ‍ॅम्स्टरडॅम-मुंबई अशा प्रवासाच्या विमान तिकिटासाठी संशयित अनुप अनिल सुगंधी, अनया अनुप सुगंधी ऊर्फ पौर्णिमा महाले (दोघे रा. नाशिक) आणि सूरज माथूर (रा. मुंबई) या तिघांनी अ‍ॅड. पाटोदकर यांच्याकडून सुमारे 91 हजार रुपये घेतले व तिकीट मेलवर पाठविले होते. अ‍ॅड. पाटोदकर यांनी तिकिटाची शहानिशा केली असता त्यात तारखांचा घोळ आढळून आला. त्यामुळे अ‍ॅड. पाटोदकर यांनी सुगंधी दाम्पत्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी सूरज माथूरचा संपर्क क्रमांक दिला. तिघांनी मिळून विमानाचे तिकीट देतो, असे आश्वासन दिले, मात्र तिकीट दिले नाही. त्यामुळे अ‍ॅड. पाटोदकर यांनी संबंधित कंपनीच्या दिल्लीतील अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तिकीट बनावट असल्याचे व त्यांच्याकडे सूरज माथूर हा व्यक्ती कामास नसल्याचे सांगितले. फसवणूक झाल्याने अ‍ॅड. पाटोदकर यांनी मुंबई नाका पोलिसांकडे संशयित अनुप अनिल सुगंधी, अनया अनुप सुगंधी उर्फ पौर्णिमा महाले आणि सूरज माथूर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चक्क वकिलालाच दिलं विमानाच बनावट तिकीट appeared first on पुढारी.