नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर

अग्निशमन दल,www.pudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे येवला परिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ७६ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येवला शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व शहराच्या सुरक्षितेसाठी मदत होणार आहे.

येवला नगरपरिषदेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे १७ वर्ष जुने झालेले असल्याने ते वारंवार नादुरुस्त होते. येवला नगरपरिषद ही ‘ब’ वर्ग नगरपरिषद असून येथून लोकसंख्या जवळपास ७० हजार आहे. येवला शहरात १६ ते १७ हजार घरांची संख्या आहे तर ५०० येवला पैठणीचे दुकाने आहेत. तसेच १५ पेट्रोल पंप, ४ गॅस एजन्सीज् आहेत आणि त्यांच्या टाक्यांचा साठा देखील येवला शहरामध्ये आहे. येवला शहर हे सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी असून या ठिकाणी त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील धर्मांतराची घोषणा येवला शहरात मुक्तिभूमी येथे केलेली असल्याने त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे येवला शहराकरीता लाखो पर्यटक भेटी देण्यासाठी येतात. येथील शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला असून शहराचे क्षेत्रफळ सुमारे १२.७९ चौ.कि.मी. आहे. त्याचप्रमाणे येवला तालुक्यामध्ये १२४ खेडे समाविष्ठ असून त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २.६३ लक्ष इतकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मात्र सोयीसुविधांचा अभाव जाणवत असल्याने या भागात आग लागण्याच्या घटना अतिशय मोठ्या प्रमाण घडत आहेत. येवला नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेले अग्निशमन वाहन हे जुने असल्याने ते घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकत नाहीत किंवा रस्त्यातच वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा नियोजन समितीतून येवला नगरपरिषदेला अग्निशमन वाहन खरेदीसाठी ७६ लक्षचा निधी मंजूर appeared first on पुढारी.