नाशिक : जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनची तयारी, १० सॅटेलाइट फोन सज्ज

सॅटेलाइट फोन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सून कालावधीत ओढावणाऱ्या आपत्तीवेळी तातडीने संपर्क साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० सॅटेलाइट फोन तयार ठेवले आहेत. या फोन‌मुळे यंत्रणांना एकमेकांशी संवाद साधणे सुकर होणार असून, आपत्कालीन घटनेच्या ठिकाणी वेेळेत मदत पोहोचविणे शक्य होणार आहे.

महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून पोहोचला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मुंबईसह तो संपूर्ण राज्यात हजेरी लावू शकतो. राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक बाब आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले असले, तरी स्थानिक पातळीवर यंत्रणांनी सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील 15 ही तालूक्यांत आपत्कालीन कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यापुढे जात प्रशासनाने मुख्यालयासह मालेगाव व अन्य सहा तालुक्यांमध्ये सॅटेलाइट फोन सज्ज ठेवले आहेत.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनांत वाढ झाली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून व परराज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक नाशिकमध्ये हजेरी लावतात. पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे दरवर्षी छोट्या-मोठ्या दुर्घटना होतात. तसेच जिल्ह्याच्या दुर्गम भागात दरडी कोसळणे, पुरामुळे रस्ते संपर्क तुटणे यासह अन्य नैसर्गिक घटनाही घडतात. अशा वेळी मोबाइल यंत्रणा ठप्प होत असल्याने आपद्ग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्यात प्रशासनाला अनंत अडचणी येतात. आता सॅटेलाइट फोन्स‌्मुळे प्रशासनाला आपत्तीग्रस्तांच्या मदतीला तातडीने धावून जाणे शक्य होणार आहे.

सॅटेलाइट फोनचे प्रशिक्षण

जिल्ह्यात एकूण १० सॅटेलाइट फोन सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयी तीन, तर मालेगाव अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे एक संच उपलब्ध आहे. याशिवाय पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व बागलाण तालुक्यांत प्रत्येकी १ संच वितरीत करण्यात आला आहे. तेथील कर्मचाऱ्यांना फोन हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या तालुक्यांत एखादी दुर्घटना घडल्यास सॅटेलाइट फोनमुळे वेळेत यंत्रणांशी संपर्क साधणे सोपे होणार आहे.

आपत्कालीन किट्सची सज्जता

पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडे निश्चित करण्यात आले आहेत. तसेच पुराचा धोका असलेल्या निफाड तालुक्यात बोटीही सज्ज आहेत. लवकरच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तालुक्यांसाठी लाइफ जॅकेट, सर्च लाइट, रॅपलिंग किटस‌्सह आपत्ती निवारणासाठीची अन्य साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

The post नाशिक : जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनची तयारी, १० सॅटेलाइट फोन सज्ज appeared first on पुढारी.