नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाने दडी मारल्याने यंदा जिल्ह्यातील टंचाईची चिंताजनक बनली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये ५६ टक्के पर्जन्य तुट आहे. पुरेश्या पावसाअभावी गंगापूरवगळता जिल्ह्यात अन्य धरण समुहांची परिस्थिती विदारक आहे. जिल्ह्यातील ४४ महसुली मंडळांत २१ दिवसांपासून पावसाना खंड दिल्याची धक्कादायक बाब पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत समोर आली. गंगापूरमधील उपलब्ध साठ्यामुळे नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार असली तरी अन्य ठिकाणी पाण्याचा प्रश्न जटील बनणार आहे.

अलनिनोमुळे यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभुमीवर पालकंमत्री भुसे यांनी सोमवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, सर्वश्री आमदार दिलीप बनकर, सुहास कांदे, सरोज अहिरे व हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल आदी उपस्थित होते.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर धरण समुहात ६ हजार ५१० दलघफु पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक महापालिकेला सुमारे ४५०० दलघफु पाण्याची मागणी आहे. सध्याचा साठा बघता शहरवासीयांचे पाण्याचे संकट दुर झाले आहे. पण दारणा, ओझरखेड, पालखेड व चणकापूर समुहात गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी साठा उपलब्ध असल्याने या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य संकटात आहे.

पालकमंत्री भुसे यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत पिण्याचे पाणी तेथून पुढे वर्षभर अशा पद्धतीने धरणांच्या उपलब्ध साठ्याचे नियोजनाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच पावसाअभावी पिके करपली असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यामुळे पिकवीमा कंपन्यांनी सर्व्हे करताना सरसकट करावा. सर्व्हेअरचा शहाणपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी दिली. बैठकीत महसुल, कृषी, पाटबंधारे व अन्य विभागांचे अधिकारी हजर होते.

४१ गावांत पेरणीच नाही

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत माहिती देताना यंदा ५६ टक्के पर्जन्य कमी झाले आहे. पावसाअभावी सिन्नरच्या ४१ गावांमध्ये पेरणीच झाली नसल्याचे बाबही अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. तसेच जिल्ह्यात ९२ पैकी ४१ मंडळांमध्ये पहिला ट्रिगर राबविता आला नसल्याचे सांगितले. ४४ मंडळांत २१ दिवस पावसाने खंड दिला असून हा आकडा ६० वर पोहचले, अशी भिती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

आ. कांदेचे बाण

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणांमधील पाण्याची आकडेवारी सादर करताना त्यात खोटी माहिती देत आहेत. धरणांमधील मृतसाठा धरून आकडे सादर केले जात आहेत. नागासाक्यामध्ये ४०० हून इलेक्ट्रीक मोटारींच्या सहाय्याने मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा होत असल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. त्यावर तातडीने सदर मोटारींचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश भुसे यांनी दिले. आ. खोसकर यांनी जलजीवन मिशनमध्ये अद्यापही काही वाड्यांचा समावेश केला नसल्याची तक्रार केली.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती चिंताजनक, ना. भुसे यांच्या अध्यक्षतेत बैठक appeared first on पुढारी.