नाशिक जिल्ह्यात कुणबीच्या ७६ हजारांहून अधिक नोंदी आढळल्या

कुणबी नोंदी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा प्रशासनाने 15 तालुक्यांमध्ये मराठा – कुणबीच्या शोध मोहिमेसाठी ४० लाख नोंदींची पडताळणी केली. यामध्ये कुणबीच्या ७६ हजार ३५३ नोंदी आढळून आल्या आहेत. या शोध मोहिमेवेळी विविध शासकीय विभागांमधील १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मराठा-कुणबी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याकरिता जिल्हा तसेच तालुकास्तरावर समित्या गठीत केल्या आहेत. या समित्यांमार्फत शासकीय यंत्रणेकडे १८१८ पासून दस्तावेज पडताळले जात आहेत. त्यामध्ये शासकीय दस्तावेज, आजवर दिलेली वेगवेगळी प्रमाणपत्रे व दाखले, जन्म व मृत्यू दाखले तसेच शाळा मुख्याध्यापकांनी १९६७ पूर्वी जारी केलेल्या शालेय दाखल्यात कुणबी जातीचा उल्लेख असल्यास, अशा कागदपत्रांचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत ४० लाख नोंदींची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीवेळी ७६ हजार ३५३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी शोधण्याचे काम पूर्ण झाल्यावर संबंधित कागदपत्रांचे स्कॅनिंग करत जतन केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आढळलेल्या नोंदींचे होणार स्कॅनिंग

जिल्हा पातळीवर आढळलेल्या नोंदींचे स्कॅनिंग करताना ते जिल्हा प्रशासन तसेच शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात जनतेला या नोंदी तातडीने उपलब्ध हाेण्यास मदत मिळणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक जिल्ह्यात कुणबीच्या ७६ हजारांहून अधिक नोंदी आढळल्या appeared first on पुढारी.