नाशिक : जिल्ह्यात खतटंचाई, खत कंपन्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम

खत टंचाई,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात खतटंचाई जाणवत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभाग व खत कंपन्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक घेत निर्धारित उद्दिष्टानुसार खतपुरवठा करण्याचे निर्देश दिले. खत कंपन्यांनी महिनानिहाय प्राप्त आवंटनानुसार नियमित अनुदानित खतांचा पुरवठा केलेला नसल्याने भुसे यांनी संबंधित कंपन्यांची कानउघाडणी करत येत्या आठ दिवसांत ही खत कोंडी सोडविण्याचा अल्टिमेटम दिला.

सद्यस्थितीत जिल्ह्यात पेरणीच्या अनुषंगाने, युरिया खताच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत कृषी विभागाने संबंधित कंपनी प्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही जिल्ह्यात खतांचे रेक उपलब्ध होत नसल्याचे भुसे यांच्या निदर्शनास आले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनीही याबाबत कंपनीस लेखी पत्र दिल्याची बाब आढावा बैठकीत निदर्शनास आली. जिल्ह्यात जवळपास सर्वच कंपनीने मंजूर आवंटनानुसार अनुदानित खतांचा पुरवठा न केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत संबंधित खत कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे नियमित खतपुरवठ्याबाबत भुसे यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तत्काळ मंजूर आवंटनाप्रमाणे मागील पुरवठ्यातील तुटीसह शिल्लक खतपुरवठा करावा, तसेच युरिया खताचा प्राधान्याने तत्काळ पुरवठा करण्याबाबत आदेश संबंधित पुरवठादार कंपनीना दिले आहेत. तसेच कृषी आयुक्त पुणे यांनाही समन्वय साधून खतटंचाईची समस्या आठवडाभरात सोडविण्याचे निर्देश दिले.

कंपनी आणि खतपुरवठा सद्यस्थिती….

रा.खत उत्पादक कंपनी- चंबळ फर्टिलायझर अॅण्ड केमिकल लि. या कंपनीने १४,२०५ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टियलाझयर्स लि. मुंबई या कंपनीने ३५,२८१ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीने १०,३२६ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने ७,५८२ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. इंडियन फार्मर्स फर्टियलाझर को. ऑप. लिमिटेड (इफको) कंपनीने १५,७३४ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. साऊथर्न पेट्रोकेमिकल को-ऑपरेशन लिमिटेड या कंपनीने ४,१५२ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. नॅशनल फर्टिलाझर ॲण्ड केमिकल लिमिटेड या कंपनीने आजपर्यंत जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा केलेला नाही. कंपनीने महिनानिहाय प्राप्त झालेल्या आवेदनानुसार नियमित अनुदानित खतांचा पुरवठा केलेला नाही. कृषक भारती को. ऑप. लिमिटेड (कृभको) या कंपनीने १६,३२८ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. गुजरात स्टेट फर्टिलायझर अॅण्ड केमिकल लिमिटेड या कंपनीने ४,४३७ मे.टन खतांचा कमी पुरवठा केला आहे. पॅरादिप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीने २४,२०६ मे. टन खतांचा कमी पुरवठा केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात खतटंचाई, खत कंपन्यांना आठ दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.