नाशिक : जिल्ह्यात नवीन वाळू धाेरण बारगळणार! तालुक्यांचा विरोध

वाळू धोरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्याच्या तोंडावर शासनाच्या नवीन वाळू धोरणाला जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. देवळा व बागलाण तालूकावासीयांनी आक्रमक भूमिका घेत नदीघाटांमधून वाळूचे एकही वाहन बाहेर पडू न देण्याचा निर्धार केला आहे. ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त या कारणांपायी जिल्ह्यात वाळू धोरण बारगळणार आहे.

राज्यातील वाळूमाफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करतानाच जनतेला कमी दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण लागू केले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वाळू डेपो उभारून त्याद्वारे जनतेला ६०० रुपये प्रतिब्रास दराने वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासकीय घरकुल उभारणीसाठी पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू पुरविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु, शासनाच्या या धोरणाला पहिल्या दिवसापासून राज्यातून तीव्र विरोध होत आहे. नाशिक जिल्हाही त्यात अपवाद ठरलेला नाही.

नाशिक जिल्ह्यात १३ वाळूघाट आणि ६ ठिकाणी डेपाे निश्चित केले आहेत. या सहाही डेपोंतून ६०० रुपये प्रतिब्रास दराने वाळू देण्यात येणार आहे. मात्र, वाळूघाट असलेल्या तालुक्यांमधून वाळू उपशाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. देवळा व बागलाणमधील गावांनी नदीघाटांमधून एकही ब्रास वाळू उपसा न करू देण्याचा ठराव केला आहे. मालेगावमध्येही नवीन वाळू धाेरणाविरोधात आंदोलनाची धार तयार होत आहे. त्यातच कळवणमधील नदी घाट येथे ठेकेदारही नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, तेथील नदीघाटात पाणी असल्याने पर्यावरणाच्या नियमानुसार तूर्तास वाळूउपसा करता येणार नाही.

वाळूघाटांना एकीकडे विरोध होत असतानाच दुसरीकडे अवघ्या पंधरवड्यावर मान्सूनचे आगमन येऊन ठेपले आहे. शासनाच्या धोरणानुसार पावसाळ्यात नदीघाटांमधील वाळूउपसा बंद राहतो. परिणामी, जिल्ह्यात वाळू धोरणाच्या अंमलबजावणीतील अडथळे संपुष्टात येत नाहीत. अशावेळी स्वस्त दरात वाळू घेत घर उभारणीचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांचे स्वप्न भंग पावणार आहे.

डेपो कागदावरच‌!

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते गत आठवड्यात मोठा गाजावाजा करत चांदोरी येथे वाळू डेपो कार्यन्वित करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र येथील वाळूही गाळमिश्रित असल्याने नागरिकांनी या डेपोकडे काहीशी पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे अद्यापही सहा डेपोंची घोषणा निव्वळ कागदापुरती मर्यादित आहे. त्यामुळे जिल्हावासीयांवर तूर्तास नेहमीच्याच दरात वाळू खरेदी करावी लागणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यात नवीन वाळू धाेरण बारगळणार! तालुक्यांचा विरोध appeared first on पुढारी.