नाशिक : भैरवनाथ यात्रेसाठी सोनांबेत मंदिराची आकर्षक सजावट

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सोनांबे गावातील ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर हे प्राचीन व इतिहासकालीन मंदिर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मंदिरात आकर्षक मूर्ती, सुवर्ण व रेशीम असा वस्त्र पेहराव व सोन्याचा मुलामा असलेला मुकुट यासाठी दानपेटीतून व चैत्र पौर्णिमेला होणार्‍या यात्रोत्सवामधून निधी प्राप्त होत असतो. यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मंदिरासमोर देवनदी व भोगनदी यांचा पवित्र संगम आहे. या मंदिराचे पुजारी जगन्नाथ आंबेकर, नामदेव आंबेकर व रमेश आंबेकर यांनी मनोभावे भैरवनाथाची सेवा केली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी गंगा गोदावरीच्या पाण्याने भरलेल्या कावडीची मिरवणूक काढण्यात येते. गंगाजलाने भैरवनाथ महाराज मस्तकाभिषेक करण्यात येतो. सायंकाळी देवाच्या काठीची मिरवणूक काढण्यात येते. यावेळी मंदिरासमोरचा दीपस्तंभ दीपज्योतीने प्रज्वलित करण्यात येतो आणि हजारोच्या संख्येने बोकड बळी देण्यात येतात. यात्रेच्या दुसर्‍या दिवशी कुस्त्यांची दंगल, सायंकाळी रथासह बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. खंडेरायांचे भगत बबन बाबूराव पवार व भैरवनाथाचे भगत दशरथ भीमाजी पवार रथासह बारागाड्या ओढतात. या वेळी भैरवनाथाचे पुजारी धोंडी आबा यांचे भक्त निवृत्ती आंबेकर व राजाराम आंबेकर आदींची उपस्थिती असते.

ग्रामपंचायतीकडून स्वच्छता मोहीम
बुधवारी (दि. 5) व गुरुवारी (दि. 6) ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून साफसफाई करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरासमोरील हायमास्ट दुरुस्ती केली असून काशाईमाता मंदिरासमोरील रस्ता रुंदीकरण करण्यात आला आहे. यावेळी सरपंच डॉ. रवींद्र पवार, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : भैरवनाथ यात्रेसाठी सोनांबेत मंदिराची आकर्षक सजावट appeared first on पुढारी.