नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आतापासूनच रासायनिक खत खरेदीची तयारी सुरू केली आहे. पुणे येथील कृषी आयुक्तालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी रासायनिक खताचा कोटा नुकताच मंजूर केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारच्या वतीने खत परिषदेचे विभागीय आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 43 लाख 31 हजार 500 मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर केले आहे. यात नाशिक जिल्ह्यासाठी 2 लाख 22 हजार 860 मेट्रिक टन खतांचा समावेश आहे. हा खतसाठा एप्रिल ते सप्टेंबर या काळात टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल.

नाशिक जिल्ह्यासाठी 2 लाख 22 हजार 860 मेट्रिक टन, नंदुरबार जिल्ह्यासाठी 87 हजार 990 मेट्रिक टन, जळगाव जिल्ह्यासाठी 3 लाख 5 हजार 140 मेट्रिक टन, अहमदनगरसाठी 2 लाख 16 हजार 510, तर धुळ्यासाठी 94 हजार 380 मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. मंजूर करण्यात आलेला खताचा कोटा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत दरमहा प्रत्येक जिल्ह्याला देण्यात येणार आहे.

रब्बी हंगाम संपुष्टात आल्यानंतर, खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. खरीप आणि रब्बी हंगामांत विविध राज्यांकडून मागील वर्षी रासायनिक खतांची मागणी त्यापैकी शेतकऱ्यांनी वापरलेले खत आणि उपलब्ध शिल्लक खतसाठा यांचा विचार करून खरीप हंगामासाठी खतांचा कोटा मंजूर करण्यात येतो. यानुसार चालू वर्षातील खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला 43 लाख 13 हजार 500 मेट्रिक टन खताचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

खतांमध्ये युरिया 13 लाख 73 हजार 500 मेट्रिक टन , डीएपी 4 लाख 50 हजार मेट्रिक टन, एमओपी 1 लाख 90 हजार मेट्रिक टन, संयुक्त खते 15 लाख 50 हजार मेट्रिक टन आणि एसएसपी 7 लाख 50 हजार मेट्रिक टन खतांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. उपलब्ध होणाऱ्या खताचे आवंटन विचारात घेऊन राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या खताचा वापर विचारात घेऊन सर्व प्रकारच्या खतांचे आवंटन प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक जिल्ह्यासाठी २ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर appeared first on पुढारी.