नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने यंदा ‘एक शाळा, एक गणवेश’ अशी घोषणा केल्याने अन् त्याबाबत अखेरपर्यंत संभ्रमावस्था ठेवल्याने यंदा महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात शालेय प्रवेश करावा लागणार आहे. वास्तविक गणवेशांसाठी १ कोटी १८ लाख ५५ हजारांचा निधी प्राप्त झाला असला तरी, प्रत्यक्षात त्याचे वाटप शाळेच्या पहिल्या दिवसानंतर सुरू होणार आहे. यातून महापालिकेच्या २५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने ‘एक शाळा एक गणवेश’ असे धोरण निश्चित केले होते. मात्र, त्यावर अनेक टीका झाल्याने राज्य शासनाला त्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला. मात्र, या निर्णयामुळे शिक्षण विभागात गणवेशाबाबत अखेरपर्यंत संभ्रमावस्था होती. शिवाय गणवेशासाठीचा निधी प्राप्त न झाल्याने, यंदाच्या गणवेशाबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. दरम्यान, शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने आता शाळास्तरावर पूर्वीप्रमाणेच शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहेत. एका गणवेशासाठी तीनशे रुपये इतका शासनाचा दर आहे. दोन गणवेशांसाठी एका विद्यार्थ्याकरिता सहाशे रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एक गणवेश घेण्याचे मनपाचे नियोजन आहे. मात्र, सध्या मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पद हे प्रभारी असल्याने याबाबत निर्णय तत्काळ होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांना गणवेश दिले जाणार आहेत.

सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश
महापालिका शाळेत एकूण २४ हजार ६९१ इतके विद्यार्थी आहेत. यापैकी १३ हजार १३५ मुली असून, त्यात ३ हजार ११४ अनुसूचित जातीचे, तर दोन हजार ४६१ अनुसूचित जमातीचे आहेत. १२४ विद्यार्थी हे बीपीएल कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून १ कोटी १८ लाख ५५ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ५९ लाख २७ हजार सातशे रुपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर मनपाच्या खुल्या गटातील व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनादेखील गणवेश देण्यात येणार असून, त्यासाठी मनपाने आपल्या अंदाजपत्रकात ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.

असा असेल गणवेश
मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅण्ट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळेत सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची असेल. गणवेशामधील टोपी व स्कार्फबाबत शासनाकडून आदेश निर्गमित केले जाणार आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : जुन्या गणवेशानेच मनपा विद्यार्थ्यांचा शाळाप्रवेश appeared first on पुढारी.