नाशिक : टवाळखोरांची आता खैर नाही, निर्भया पथकाची फेररचना

निर्भया पथक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिलावर्गाची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना दणका देण्यासाठी पोलिसांकडून निर्भया पथक तयार करण्यात आले. मात्र, पथकास पूर्णवेळ अधिकारी, अंमलदार नसल्याने पथकाची कारवाई थंडावली होती. मात्र, आता पथकांची फेररचना केली असून, चार पथकांमध्ये नव्याने २४ अंमलदार नियुक्त केले आहेत. या पथकांनी सशस्त्र गस्त घालण्यासोबत टवाळखोरांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनेनुसार पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड विभागातील निर्भया पथकांची फेररचना करण्यात आली आहे. याआधी निर्भया पथकांमध्ये एका महिन्याच्या कालावधीसाठी अधिकारी व अंमलदारांची नेमणूक होत होती. त्यामुळे अनेक जण पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे यात बदल करून पुढील आदेश येईपर्यंत नेमणूक केलेल्या पोलिस अंमलदारांची नव्याने नेमणूक केली आहे. नव्याने फेररचना केलेल्या चारही निर्भया पथकांचे प्रमुख हे दर महिन्याला अंमलदारांसह पथकांच्या कामगिरीचा लेखी आढावा सादर करणार आहेत.

ज्यांची कामगिरी समाधानकारक असेल, त्या अंमलदारांची पथकात पुढील आदेशापर्यंत नेमणूक कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने नेमलेले अंमलदार अधिक कार्यक्षमतेने काम करून टवाळखोरांवर कठोर कारवाई करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : टवाळखोरांची आता खैर नाही, निर्भया पथकाची फेररचना appeared first on पुढारी.