नाशिक : ‘टेट’साठी शिक्षण आयुक्तांना साकडे

टिईटी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सन 2017 नंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे (टेट) आयोजन रखडले आहे. आदिवासी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घेत टेट परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, अद्यापही टेट न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तत्काळ टेट परीक्षा घेण्याचे साकडे आदिवासी डीटीएड/बीएड कृती समितीने शिक्षण आयुक्तांना निवेदनाद्वारे घातले आहे.

शिक्षण विभागाने न्यायालयात सादर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार फेब्रुवारी 2023 मध्ये टेट परीक्षा होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये तत्काळ नोटिफिकेशन देऊन प्रसिद्ध करण्यात यावे. तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा राबविणार्‍या कंपनी स्पष्टता देऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. दुसर्‍या अभियोग्यता चाचणीच्या (टेट) अभ्यासक्रमात कोणताही बदल न करता 2017 च्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा प्रक्रिया राबविण्याची मागणी समितीने केली आहे. तत्काळ टेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध न केल्यास महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती क्षेत्रातील (पेसा) 13 जिल्ह्यांतील उमेदवार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश पानडगळे, भास्कर जाधव, नीलेश चौधरी, प्रवीण अवतार, कृष्णा लहारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘टेट’साठी शिक्षण आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.