नाशिक : ‘ट्रॅप’मुळे सिव्हिलचा कर्मचारी रातोरात कर्जबाजारी

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 24 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक राजेश सुधाकर नेहुलकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळात अनेक चर्चांना पेव फुटले आहे. लाच मागणार्‍यांवर कारवाई करण्यास यंत्रणांनी सुरुवातीला केलेली टाळाटाळ, कारवाई टाळण्यासाठी एकाने कर्ज काढून रात्रीतून लाखो रुपयांची केलेली तडजोड…. अशा सुरस चर्चा सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रंगल्या आहेत.

वैद्यकीय बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात चार टक्के याप्रमाणे तक्रारदाराकडे 24 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक राजेश नेहुलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नेहुलकर याने तक्रारदाराकडे ऑगस्ट महिन्यात लाच मागितली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मोबाइलमध्ये नेहुलकर हा लाच मागत असतानाचे चित्रीकरण केले. त्यात नेहुलकर हा एका कागदावर वरिष्ठांना किती रुपये द्यावे लागतात, इतर अधिकारी व कर्मचार्‍यांना किती द्यावे लागतात, असे सांगत असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे आणखी एक लिपिकही तक्रारदाराकडे पैशांची मागणी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर तक्रारदाराने ही चित्रफीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाकडे देत कारवाईची मागणी केली. ही बाब समोर येताच एका लिपिकाच्या छातीत दुखत असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातच दाखल केल्याची चर्चा आहे. तर नेहुलकर वैद्यकीय रजा टाकून रजेवर गेला होता. तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने मुंबईतील मुख्यालयात तक्रार करून न्याय मागितल्याचे बोलले जात असून, त्यानंतर संबंधितांवर कारवाईस सुरुवात झाली. गत आठवड्यात नेहुलकर सेवेत हजर झाल्यानंतर विभागाने लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

खासगी मोबाइलद्वारे चित्रीकरण
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहुलकरने लाचेची मागणी केली. मात्र, ती स्वीकारली नसल्याने कारवाई लांबली होती. त्यामुळे लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खासगी मोबाइल किंवा इतर उपकरणांनी केलेले चित्रीकरण कारवाईसाठी ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे दुसर्‍या संशयितावरील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह आहे.

हपापाचा माल गपापा
दरम्यान, त्याच्यासोबत आणखी एकास ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. तक्रारदाराने केलेल्या चित्रीकरणात हा संशयितही लाचेची मागणी करत असल्याचे समजते. कारवाई टाळण्यासाठी या संशयिताने गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच एका पतसंस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज घेत पहिल्या टप्प्यात तीन व दुसर्‍या टप्प्यात दोन असे एकूण पाच लाख रुपयांची तजवीज केल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात रंगली. त्यामुळे ‘बिलांमधून कमवले आणि कारवाई टाळण्यासाठी घालवले’ अशा सुरस चर्चा जिल्हा रुग्णालयात रंगल्या आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘ट्रॅप’मुळे सिव्हिलचा कर्मचारी रातोरात कर्जबाजारी appeared first on पुढारी.