नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा

बोगस डॉक्टर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुबईच्या एका नामांकित फार्मा कंपनीच्या चर्चासत्रास पाठविण्याचे आमिष दाखवित भामट्याने शहरातील डॉक्टरास ऑनलाइन पद्धतीने पाच लाख 81 हजार 911 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सराईत असल्याचा अंदाज आहे.

काठे गल्ली परिसरातील बनकर चौकात राहणार्‍या डॉ. गिरीश भास्कर काळे (43) यांना हा ऑनलाइन गंडा घातला आहे. डॉ. काळे यांच्या फिर्यादीनुसार संशयित विशाल पाण्डेय (रा. दुर्गपूर, राज्य पश्चिम बंगा) याने 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान गंडा घातला. विशालने डॉ. काळे यांना फोन करून नामांकित फार्मा कंपनीने दुबईत सप्टेंबरमध्ये चर्चासत्र आयोजित केले असून, त्यासाठी त्यांना पाठविण्याची बतावणी केली. संशयिताने डॉ. काळे यांना दुबईला जाण्यासाठी लागणार्‍या विविध बुकिंगकरिता त्यांच्याकडे मोबाइल ई-पेमेंटद्वारे पहिल्यांदा साडेआठ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर विमानसेवा, रहिवास, परकीय चलनासह इतर बुकिंगसाठी डॉ. काळे यांच्याकडून पाच लाख 73 हजारांची मागणी केली. त्यानुसार डॉ. काळे यांनी ऑनलाइन पद्धतीने भामट्याला पैसे पाठविले होेते. मात्र, आर्थिक व्यवहारातील गडबड लक्षात आल्यावर डॉ. काळे यांनी संबंधित फार्मा कंपनीच्या विक्री प्रतिनिधीशी संपर्क साधला. त्यात कंपनीतर्फे असे कोणतेही चर्चासत्र आयोजित केलेले नसल्याचे डॉ. काळे यांना समजले. डॉ. काळे यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

हेही वाचा:

The post नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा appeared first on पुढारी.