नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी

डॉक्टर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार करून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (दि. 20) सुनावणी होणार आहे. दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फतही चौकशी समिती नेमण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आंतरजिल्हा बदलीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये शस्त्रक्रिया नसल्याचे कागदपत्रे नसतानाही ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपीक हिरा कनोज यांनी कागदपत्रे परिपूर्ण असल्याचे सांगत फाइल्स वरिष्ठांकडे पाठविल्या होत्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून ग्रामीण पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. श्रीवास यांचे जबाब घेतले होते. पोलिसांनी दुसर्‍यांदा दोघांना जबाबासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली असता, ते हजर झाले नसल्याचे समजते. दरम्यान, वैद्यकीय प्रमाणपत्रांमधील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ लिपीक कनोज यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे यांना अटक केली. त्यामुळे अटकेची टांगती तलवार आपल्यावरही असल्याचा अंदाज येताच जिल्हा रुग्णालयाच्या दोन तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी बुधवारी (दि. 14) अटक केलेल्या जिल्हा रुग्णालयाचा कर्मचारी कांतीलाल गांगुर्डे याच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी (दि. 17) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गांगुर्डे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी समिती तयार केली आहे. प्रमाणपत्र देताना काय निकष लावण्यात आले, प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करताना संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची सत्यता पडताळणी केली होती का, या बाबींची शहानिशा केली जाईल. – डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

जिल्हा रुग्णालयाची चौकशी समिती
गंभीर आजार नसतानाही आजारपणाचे बनावट प्रमाणपत्र देणार्‍या जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी (सर्जन), कर्मचार्‍यांच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : डॉक्टरांच्या अटकपूर्ववर मंगळवारी सुनावणी appeared first on पुढारी.